डॉ. प्रेमानंद गज्वी यांची साहित्य संमेलनाच्या निवडणूक प्रक्रियेवर टीका
एकमताने संमेलनाध्यक्ष निवडून आणल्याचे डॉ. ढेरेंकडून समर्थन
पुणे : निवडणूक प्रक्रियेमुळे अनेक मान्यवर क्षमता असूनही या पदापासून वंचित राहिले आहेत. यंदा एकमताने अध्यक्ष निवडून आणला ही चांगली सुरुवात आहे, असे नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. ढेरे यांनी सांगताच देशाचा पंतप्रधान जर लोकशाहीपद्धतीने निवडून दिला जातो तर मग संमेलनाध्यक्ष का निवडू नये? हे साहित्य परिषदेच्या अपरिपक्वतेचे लक्षण आहे अशी विरोधी भूमिका नियोजित नाट्यसंमेलनाध्यक्ष डॉ. प्रेमानंद गज्वी यांनी मांडली.
अखिल भारतीय साहित्य संमेलनाची निवडणूक लोकशाहीपद्धतीने की सन्मानाने व्हावी, यावर डॉ. ढेरे आणि साहित्य संमेलनाध्यक्षाचे उमेदवार राहिलेले नियोजित नाट्यसंमेलनाध्यक्ष डॉ. प्रेमानंद गज्वी यांनी एकाच व्यासपीठावर परस्परविरोधी सूर आळविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. निमित्त होते, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. ढेरे आणि डॉ. प्रेमानंद गज्वी यांच्या सत्कार सोहळा आणि मुलाखतीचे. डॉ. मनोहर जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नांना ढेरे आणि गज्वी यांनी उत्तरे देत कार्यक्रम रंगवला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, ललित कला केंद्राचे प्रवीण भोळे, मराठी विभागाचे तुकाराम लोमटे आणि सतीश आळेकर उपस्थित होते.
जातिव्यवस्था हे सर्वात मोठे दुखणे
प्रेमानंद गज्वी यांनी सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतलेल्या ‘छावणी’ या आपल्या नाटकाबद्दल आपली बाजू स्पष्ट केली. या नाटकातील काही संदर्भ देत त्यांनी आजच्या परिस्थितीवर भाष्य केले. जातिव्यवस्था हे आपल्याकडचे सर्वात मोठे दुखणे आहे. त्यामुळे सगळ्याच जातींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या आणि पूर्णच देशच आरक्षित करून टाका अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली.
पुरस्कार वापसीला विरोध
मी मनोरंजनवादी, प्रयोगशील आणि विचारवादी असे तीन प्रकारचे साहित्य मानतो. तसेच दलित साहित्याने दलितांचा फारसा फायदा झाला नाही उलट बाबासाहेबांची चळवळ आपण मागे नेली असे गज्वी म्हणाले. पुरस्कार वापसीबद्दल बोलताना डॉ. ढेरे आणि गज्वी दोघांनीही या कृतीला विरोध दर्शविला. पुरस्कार हा आपल्या कलाकृतीचा सन्मान आहे. तो परत करून आपण कोणाचा निषेध करतो? ज्यांनी पुरस्कार जाहीर केला त्यांचा की ज्यांच्या काळात पुरस्कार परत करत आहोत त्या सरकारचा? याचा विचार करायला हवा याकडे गज्वी यांनी लक्ष वेधले.