हॉकर्सधारकांचे दुसर्‍या दिवशीही उपोषण सुरूच

0

जळगाव । महापालिकेकडून हॉकर्सच्या हातगाड्या व इतर सामानाची तोडफोड करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ हॉकर्सकडून पालिकेसमोर उपोषण करण्यात येत आहे. आज दुसर्‍या दिवशीही हे उपोषण सुरुच होते. हॉकर्स उपोषणात महिला हॉकर्सदेखील सहभागी झाल्या होत्या. मात्र, या आंदोलनाची पालिका प्रशासनाने दखल न घेता अतिक्रमण मोहीम तिसर्‍या दिवशीही कायम ठेवली.

महापालिकेडून सोमवारपासून धडक अतिक्रमण मोहीम सुरु केली आहे. या मोहीमेत ‘नो हॉकर्स झोन‘वरील हॉकर्सचे हातगाड्या व साहित्य जागेवरच जेसिबीच्या सहाय्याने तोडून जप्त करण्यात येत आहे. बुधवारी मनपाच्या अतिक्रमण मोहिमेत नेहरू चौकापासून ते रेल्वे स्टेशन मार्गावरील हातगाड्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने तोडल्या. खासगी जागेत ठेवलेल्या हातगाड्या तोडल्याचा आरोप करीत संतप्त हॉकर्सनी कुटुंबासह येवून तोडलेल्या हातगाड्या पालिकेच्या प्रवेशद्वारावर टाकून ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानतंर सायंकाळी हॉकर्स संघटना यात सहभागी होवून कारवाई थांबत नाही तोपर्यंत उपोषणास सुरुवात करण्यात आली. आज तिसर्‍या दिवशी देखील उपोषण सुरु होते. प्रशासनातर्फे अप्पर आयुक्त यांनी हॉकर्सने केलेले अन्यायाचे आरोप फेटाळून लावले आहेत.