हॉकर्स, कर्मचार्‍यांमध्ये पुन्हा वाद

0

जळगाव । शहरात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाद्वारे गेल्या पंधरा दिवसांपासून कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई सुरू असतांना अतिक्रमण निर्मुलन पथकातील कर्मचारी व हॉकर्स यामध्ये छोटे मोठे वाद होत असतात. अतिक्रमण निर्मुलन पथक आज शिवाजी रोडवरील चौबे शाळेजवळ दुपारी 3 वाजेच्या सुमारास कारवाई करीत असतांना हॉकर्स व पथकातील कर्मचार्‍यांमध्ये हातगाडी जप्त करण्यावरून मोठा वाद होवून तेथे गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. यावेळी फळविक्रेत्यांनी पथकातील कर्मचार्‍यांना बेछुट शिवीगाळ तसेच धक्काब्बुकी, दमदाटी करून जप्त केलेली गाडी पळवून नेल्याचा प्रकार घडला.

आंबे फेकल्याचा आरोप
अतिक्रमण विभागाचे पथक शिवाजी रोड परिसरात गेले असता त्यांना चौबे शाळेजवळ नो हॉकर्सझोनमध्ये आंबे विक्रेते व्यवसाय करीत असल्याचे त्यांना दिसले. यावेळी एका आंबे विक्रेत्याची हातगाडी अतिक्रमण विभागाच्या पथककाडून जप्तीची कारवाई सुरू होती. यात आंबेविक्रेत्याने गाडीवरील आंबे स्वतः रस्त्यांवर फेकून देत धिंगाणा घालून अतिक्र्रमण विभागाच्या कर्मचार्‍याने आंबे फेकल्याचा आरोप करीत त्यांना शिवीगाळ व मारहाण करण्याचा प्रकार घडला. दरम्यान हॉकर्सकडून अतिक्रमण विभातील कर्मचार्‍यांवर किरकोळ दगडफेक करण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कर्मचार्‍यांशी घातली हुज्जत
चौबे शाळेजवळ अतिक्रमण निर्मुलन पथकाने दोन गाड्या जप्त केला असता यातील एका आंबा विक्रेत्या हातगाडीधारकाने कर्मचार्‍यांकडून त्याची हातगाडी हिसकवून घेतली. दरम्यान, या कारवाई दरम्यान दगडफेक देखील करण्यात आल्याचे समजते. ही कारवाई सुरू असतांना तेथे अतिक्रमण अधिक्षक एच.एम. खान हे देखील तेथे हजर होते. खान यांच्या समोर हा सर्व प्रकार घडला. यावेळी पथकाने दुसरी हातगाडी जप्त करण्याचा प्रयत्न केला असता त्या हातगाडीधारकानेही त्याची गाडी जप्त करू देण्यास पथकास नकार दिला.

अतिक्रमण अधिक्षकांसमोर घडला प्रकार
पथकाने एक हातगाडी सोडलेली असतांना दुसरी कशी पडता असा युक्तीवाद या हातागाडीधारकाने केला. या दोघा हातागाडीधारकांनी महापालिका कर्मचार्‍यांनी जप्त केलेल्या हातगाड्या सोडवून घेत स्वतः घेवून गेले. हे सर्व घटना घडत असतांना अतिक्रमण अधिक्षक एच. एम. खान व पोलीस कर्मचारी तेथे उपस्थित होते. मात्र, त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. हे दोघे फळ विक्रेते हातगाडीधारकांनी पथकातील कर्मचार्‍यांना शिवीगाळ केली. आंबे विक्रेत्यांवर जप्तीची कारवाई करीत असतांना याठिकाणी मोठ्या प्रमाणात हॉकर्स याठिकाणी दाखल झाले. त्यांनी परिसरात अतिक्रमण विभागातील कर्मचार्‍यांशी हुज्जत घालून जप्त करण्यात आलेल्या हातगाड्या हॉकर्स घेवून गेले. हॉकर्सने कर्मचार्‍यांकडून हातगाडी ओढून नेत असतांना कर्मचार्‍यांना शिवीगाळ करीत होते. अतिक्रमण निमुर्लन पथक व हॉकर्समध्ये वाद होत असतांना इतर हॉकर्सने गर्दी केली होती. हॉकर्स व कर्मचार्‍यांमधील वाढता वाद बघता पोलिस संरक्षण घेण्यात आले होते. मात्र पोलिसांनीदेखील येथे बघ्याची भूमिका घेतली.

मनपा गाडीला घेराव
हातगाडी जप्त करीत असतांना आंबेविक्रेत्यांनी अतिक्रमण विभागाच्या गाडी भोवती घेराव घातला. दरम्यान त्यांच्याकडून अतिक्रमण विभागातील कर्मचार्‍यांना शिवीगाळ करण्यात आली. अतिक्रमण विभागातील कर्मचार्‍यांनी गाडीवरील आंबे रस्त्यावर फेकल्याचा आरोप केल्यानंतर परिसरातील हॉकर्स त्या ठिकाणी जमा झाले. दरम्यान हॉकर्स मोठ्या संख्येने जमा होत असल्याने त्याठिकाणी तणाव निर्माण झाला होता. हॉकर्स व अतिक्रम विभागाच्या कर्मचार्‍यांमध्ये वाद सुरु असतांना त्याठिकाणी शनिपेठ पोलिस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते. परंतु, पोलिसांनी या वादात हस्तक्षेप करण्याचे कर्तव्य न दाखविता त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. यावरुन महापालिका कर्मचार्‍यांमध्ये पोलिस प्रशासनाविरोधात रोष पहावयास मिळाला.