जळगाव। शहरातील बहिणाबाई उद्यान, सागर पार्क व डी.एस.पी. चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप येथील हॉकर्संच्या जळगाव शहर हॉकर्स व टपरीधारक संघटनेतर्फे महानगर पालिकेसमोर ठिय्या आंदोलन शुक्रवारपासून सुरू करण्यात आले आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण करण्याचा निर्धार आंदोलन कर्त्यांनी व्यक्त केला आहे. ठिय्या आंदोलनकर्ते त्यांनी मूळजागेवर व्यवसाय करू द्यावा, हॉकर्संना ओळखपत्रांची वाटप करण्यात यावी तसेच हॉकर्स झोन आखून देण्याची मागणी केली आहे. यासोबतच अतिक्रमण लाईन्सस लागु करण्यात यावे, राष्ट्रीय फेरीवाला धोरण लागु करण्यात यावे आदी मागण्या केल्या आहेत. आमच्या व्यवसायाला संरक्षण द्यावे अशी मागणी आंदोनकर्त्यांकडून करण्यात येत होती.
कुटुंबिय, कर्मचार्यांसह हॉकर्संचा सहभाग
हॉकर्स बांधव आपल्या कर्मचारी व कुटुंबासोबत महानगर पालिकेसमोर हजर होते. यावेळी आंदोलनस्थळी हॉकर्संसाठी खिचडी बनवून त्याचे वाटप करण्यात आले. बेमुदत ठिय्या आंदोलन जोपर्यंत न्याय नाही तोपर्यंत सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी हॉकर्स बांधवांनी व्यक्त केला आहे. मागील दिड वर्षांपासून आमच्या व्यवसायावर संकट चालु असून आमच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे हॉकर्स बांधव सांगत होते. यावेळी प्रशासनाचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी डफ वाजून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. शुक्रवारी सुरू झालेल्या या आंदोलनात जवळपास 300 ते 400 हॉकर्स बांधवांनी सहभाग घेतला होता. यावेळी आंदोलकांना अध्यक्ष सुनील सोनार, सुनील जाधव, मोहन तिवारी, दिनेश हिंगणे, राजु चौधरी, विजय पवार, शेखर शिंपी यांनी मार्गदर्शन केले.