वैशाख वणवा ; दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य
भुसावळ- हॉटसिटी म्हणून जिल्ह्यात ओळख असलेल्या भुसावळात तापमानाचा पारा दिवसागणिक वाढतच आहे. सोमवारी शहराचे कमाल तापमान 44 अंशावर पोहोचल्यानंतर लागलीच दुसर्या दिवशी मंगळवारी सकाळी भुसावळचा पारा तब्बल 45.5 अंशावर पोहोचल्याची नोंद केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयात करण्यात आली. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत असून अंगातून घामाच्या धारा वाहत असून उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. सकाळी नऊ वाजेपासूनच उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असल्याने दुपारच्या वेळी शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे.
सायंकाळनंतर रस्त्यांवर वर्दळ
भुसावळ शहरात सरासरी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तापमानात वाढ होते. यंदा मात्र मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच तापमानात वाढ सातत्याने होत असताना दिसून आली. एप्रिल हिटनंतर मे महिन्यातदेखील तापमानाचा पारा सलग वाढलेलाच दिसून आला. सोमवारी 44 अंशावर असलेले तापमान मंगळवारी 45.5 अंशावर पोहोचले. अद्याप मे महिना संपण्यास दहा दिवसांचा अवधी शिल्लक असून जून महिन्यात वातावरणात बदल झाल्यानंतरच शहरवासीयांना गारवा मिळणार आहे मात्र तोपर्यंत उन्हाचे असह्य चटके सोसल्याशिवाय पर्याय नाही. मंगळवारी शहराचे किमान तापमान 30.5 अंश तर आर्द्रता 43 टक्के असल्याचे केंद्रीय जल आयोग कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.