ठाणे : माहिती अधिकाराचा गैरवापर करीत अनधिकृत बांधकामे करणाऱ्या बड्या हॉटेल व्यावसायिकांना धमकावून लाखों उकळणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने सहा महिने कारावास आणि तक्रारदाराला दोन महिन्यात दीड लाखांची नुकसानभरपाई देण्याची शिक्षा ठोठावली.किरण महादेव वैद्य (वय 47) रा.उथळसर,ठाणे असे त्या माहिती अधिकार कार्यकर्त्याचे नाव असून तो उपभोक्ता सरंक्षण सेवा समितीचा अध्यक्ष आहे.ठाणे न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी आर.एम.कुलकर्णी यांनी हा निकाल दिला.
ठाण्यात आलिशान कार्यालय थाटून वैद्य याने बड्या हॉटेलांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांची माहिती ठाणे महापालिकेकडून माहितीच्या अधिकारात गोळा केली होती.त्यानुसार,त्या हॉटेलमालकांच्या तक्रारी पालिकेकडे करण्याचे धमकावून वैद्य याने तब्बल साडे सहा लाखांची माया उकळली होती.याप्रकरणी 2012 साली नौपाडा आणि ठाणे नगर पोलिसात त्याच्याविरुद्ध दन गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या.तक्रारदार डॉ.रेखा शेट्टी आणि रुपा रामप्रसन्ना नाईक यांच्या कोपरीतील मिथुना व ट्विन्स हॉटेलमध्ये अनधिकृत बांधकाम केलेलं आहे.त्याची माहिती काढून वैद्य याने रक्कम उकळली होती.या खटल्यात सरकारी वकिलांनी युक्तिवाद करून वैद्य याच्या मोडस ऑपरेंडीचा खुलासा केल्याने न्यायदंडाधिकार्यांनी शिक्षा ठोठावली.दरम्यान,वैद्य याने 2010 पासून माहिती अधिकार आणि ग्राहक सरंक्षण कार्यकर्त्याच्या नावाखाली अनेक व्यवसायिकांकडून रक्कम उकळली असल्याचे समजते.