हॉटेल चालकावर कोयत्याने वार

0
चिंचवड : हॉटेलमध्ये दहशत करण्याच्या उद्देशाने हॉटेल चालकावर कोयत्याने वार केले. यामध्ये हॉटेल चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास हॉटेल खुशबू येथे घडली. विजयकुमार परमानंद भोजवानी (वय 49, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दीपक दत्ताराम कदम (वय 26, रा. रहाटणी), प्रणित नितीन पोटे (वय 23, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजयकुमार चिंचवडमधील दर्शननगरी येथे खुशबू हॉटेल चालवतात. आरोपी आणि अन्य एक अल्पवयीन मुलगा असे तिघेजण विजयकुमार यांच्या हॉटेलमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने आले. त्यांनी विजयकुमार यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच कोयत्याने वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी विजयकुमार यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेऊन त्याची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.