होमगार्डस्ला न्याय मिळवून द्यावा

0

शिंदखेडा । पोलीसांच्या खांद्याला खांदा लावून परीवाराची कोणतीही चिंता न करता सण असो वा उत्सव यामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात गृहरक्षक दलाचे स्वयंसेवक होमगार्ड आपली जबाबदारी चोखपणे पार पाडीत असतात. मात्र त्यांच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल घेतली जात नसते. धुळे जिल्ह्यातील 250 पुरूष व 75 महिला स्वयंसेवक होमगार्डला कामावरून कमी करण्यात आले आहे. इतर ठिकाणी नोकरी मिळण्याचे वय निघून गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महासमादेशकांनी कामावरून कमी करण्याचा आदेश दिल्याने गृहरक्षक दलाचे स्वयंसेवक बेरोजगार झाले आहे. महाराष्ट्रातून जवळपास वीस हजार होमगार्डावर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. शासन दरबारी या होमगार्डस्ची योग्य बाजू मांडून न्याय मिळवून द्यावा या मागणीचे निवेदन शिंदखेडा होमगार्ड पथकाने पर्यटन व रोजगार हमी योजनामंत्री जयकुमार रावल यांना दिले आहे.

तीन वर्षांनंतर पूर्ननियुक्ती
राज्यामध्ये स्वयंसेवक होमगार्डस्ची संख्या 51 हजार एवढी आहे. पोलीस प्रशासनाला शांतता व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यात त्यांचे सहकार्य मोलाचे असते. दर तीन वर्षे सेवा झाल्यानंतर पूर्ननोंदणी करून पूर्ननियुक्तिचे पत्र संबंधित होमगार्डस् दिले जाते. शासन आदेशानुसार या होमगार्डस्चे निवृत्तीचे वय 55 वर्षे आहे. पंचावन्न वर्षे सेवा केल्यानंतर सेवा केल्याचे प्रमाणपत्र व यथोचित सत्कार करून केलेल्या कामाचे मूल्यमापन होत होते.

जिल्ह्यात 900 स्वयंसेवक
उल्लेखनीय कार्य करणार्‍या होमगार्डस्चा राष्ट्रपती पदक देवून गौरव देखील करण्यात येत असतो.मात्र महासमादेशकांनी कामावरून या होमगार्डस्ना कमी करण्याचे आदेश देवून अन्यायच केला आहे. धुळे जिल्ह्यातील 900 पैकी 250 पुरूष व 75 महिला होमगार्ड स्वयंसेवकांची पूर्ननोंदणी न करता कामावरून कमी करण्याचे आदेश देवून मानसिक खच्चीकरणच केले आहे. यातील काही स्वयंसेवकांची सेवा अठरा वर्षापेक्षा अधिक झाली आहे.

यांच्या आहेत स्वाक्षर्‍या
कामावरून कमी झाल्याने कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न या सेवकांसमोर निर्माण झाला आहे. शासन दरबारी या स्वयंसेवकांची बाजू मांडून न्याय मिळवून द्यावा अशी कैफीयत तालूका होमगार्ड पथकाने ना.जयकुमार रावल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मांडली आहे. निवेदनावर मोतीलाल चौधरी, दगडू कुंभार, गोपाल पवार, मनोहर भदाणे, सुधाकर मराठे, दिलीप खैरनार, सुदाम साळूंखे, कमल परदेशी, कल्पना जोशी, रत्नप्रभा कुलकर्णी, निर्मलाबाई माळी, आशाबाई पाटोळे, सुनंदा सैंदाणे, रत्ना मराठे, प्रल्हाद भदाणे, सुभाष माळी यांच्या सह्या आहेत.

होमगार्डच्या माध्यमातून देशसेवा करता येईल या आशेने महिला होमगार्ड म्हणून भरती झाले. तसेच कुटूंबाचा आर्थिक भार कमी करण्यास मदत करते आहे. याचा आनंद नेहमीच असायचा. मानधनाचा विचार न करता या सेवेत आम्हीस्वतःला झोकून दिले. मात्र कामावरून कमी करण्याचा आदेश आल्याने अतिशय दुःख झाले. शासनाने या प्रकरणात लक्ष घालून होमगार्ड स्वयंसेवकांना न्याय द्यावा अशी अपेक्षा आहे.
– कल्पना जोशी, महिला होमगार्ड