होय, मीच राज्यातील युती तोडली म्हणून भाजपाचा आज मुख्यमंत्री

0

माजी मंत्री एकनाथराव खडसेंचा दावा : जळगावात युती तोडली नसती तर मिळाले नसते यश

भुसावळ (गणेश वाघ)- जळगावात शिवसेना-भाजपाची युती तोडली नसती तर कदाचित एव्हढ्या जागा भाजपाला मिळाल्याही नसत्या. आपण युतीला विरोध केल्याने भाजपा स्वबळावर लढती व त्यामुळे जळगावात भाजपाची सत्ता आली. या यशाचे श्रेय आपल्या मिळाले काय अथवा न मिळाले काय त्यामुळे आपल्याला फरक पडत नाही. जनता-जनार्दनाला सर्व बाबी माहिती असतात त्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यशाचे श्रेय घेत असतील त्यांनाही आपल्या शुभेच्छा आहेत, असे स्पष्ट मत माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केले. ते म्हणाले की, जळगावच काय राज्यातील सेनेशी युती तोडण्यात आपली प्रमुख भूमिका होती म्हणून भाजपाचा आज मुख्यमंत्री आहे, असा गौप्यस्फोट त्यांनी करीत विरोधी पक्ष नेता व ज्येष्ठ नेता असल्याने आपण मुख्यमंत्री व्हायला हवे होते मात्र पक्षाने आदेश दिला त्याप्रमाणे आपले काम सुरू आहे, असे त्यांनी सांगून पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचे खदखदही व्यक्त केली. भुसावळ शहरातील आयएमए सभागृहात भुसावळ विभागात चार पालिकांचा उर्जा बचतीसंदर्भात महत्त्वाचा करार खडसे यांच्या उपस्थितीत शनिवारी झाला. याप्रसंगी ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.

तर मीच मुख्यमंत्री व्हायला हवे होते मात्र आदेशाचे पालन केले
राज्यातील सेनेशी युती तोडून स्वबळावर लढावे यासाठी आपण आग्रही होतो तर माझ्या विचारांचेही काही नेते होते. युती तोडण्यात आपलाच पुढाकार असल्याने राज्यात भाजपाला यश मिळाले. तसे पाहिले तर विरोधी पक्षनेता व ज्येष्ठ म्हणून मीच होतो त्यामुळे मुख्यमंत्री मीच व्हायला हवे होते मात्र पक्षाने जे आदेश दिले ते आपण मान्य केले त्यामुळे पक्षापेक्षा कुणी मोठा नाही, हे खडसेंना नम्रपणे नमूद केले मात्र यामुळे खडसेंना मुख्यमंत्री व्हायचे होते ही सुप्त ईच्छाही यानिमित्त दिसून आली. पक्षात ज्येष्ठत्व नाकारले जात नाही, असेही खडसे याप्रसंगी म्हणाले.

जळगावातील यश महाजनांचे असल्यास त्यांना शुभेच्छा !
जळगावातील यशाबद्दल खडसेंना श्रेय का देण्यात आले नाही ? याबाबत खडसे यांना छेडले असता खडसे म्हणाले की, जळगावातील सेना-भाजपाशी युती होत होती मात्र केंद्र-राज्यात भाजपाची सत्ता असताना युतीची गरज नसल्याने आपण या युतीस विरोध केला शिवाय विविध प्रभागात झालेल्या सभांमध्ये त्याबाबत जोरदार टिका देखील केली. युती तुटली म्हणून भाजपाला प्रचंड यश मिळाले अन्यथा भाजपाच्या वाट्याला किती जागा आल्या असता हेदेखील सांगणे कठीण असल्याचे खडसे म्हणाले. गेल्या 30 वर्षांपासून जळगाव पालिकेतील अपप्रवृत्तींविरुद्ध आपण लढा देत आहोत शिवाय अन्याय, अत्याचाराबाबत आपण सातत्याने आवाज उठवला आहे त्यामुळेच अशा लोकांशी युती करण्यास आपला विरोध असल्याचे ते म्हणाले. कुठल्याही निवडणुकीत मिळालेले यश हे एकाचे नसते तर कार्यकर्त्यांसह नेता व सर्वांचेच असते, असे सांगत मंत्री महाजन जळगावातील यशाचे श्रेय घेत असतील तर त्यांनी ते खुशाल घ्यावे, आपल्या त्यांना शुभेच्छा आहेत, असे खडसे म्हणाले. श्रेयासाठी धडपड तोच करतो ज्याला श्रेय

फोटोमुळे मी मोठा नाही माझी उंची ‘त्या’ पलिकडची
प्रचारात खडसेंचा फोटो मोठा वापरला जातो तर आभाराच्या जाहिरातीत मात्र छोटा फोटो का? असा प्रश्‍न विचारला असता खडसे म्हणाले की, आपल्याला त्यामुळे काही फरक पडत नाही, आपली उंची त्या पलिकडे गेली आहे, असे सांगते ते म्हणाले की, खडसेंच्या आवाजाची नक्कल करून क्लीप व्हायरल करण्यात आली व भाजपाच्या विजयासाठी मते मागण्यात आली त्यामुळे खडसेंचे महत्व आजही कायम आहे हे स्पष्ट होते, असे खडसे यांनी सांगितले. या प्रकारामागे कोणाचा हात आहे? याचा तपास पोलीस करीत असल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत जिल्ह्यात जे भाजपाला यश मिळाले ते फोटोमुळे नाही तर कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. भुसावळ, बोदवड, सावदा, मुक्ताईनगरात भाजपाला सत्ता मिळाली त्यासाठी एकाही बाहेरच्या आमदाराची गरज पडली नाही कारण त्यासाठी नाथाभाऊ सक्षम असल्याचे ते म्हणाले. आजही नऊ जिल्हा परीषद सदस्य भाजपाचे तर विभागात जवळपास सर्व पंचायत समिती सदस्य भाजपाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

जळगावची जवाबदारी महाजनांना दिल्याने फरक नाही
जळगावच्या निवडणुकीत खडसेंना बाजूला सारून मंत्री महाजनांना जवाबदारी देण्यात आली याविषयी छेडले असते खडसे म्हणाले की, महाजनच काय अन्य दुसर्‍या कुणा नेत्याला जवाबदारी दिली तरी आपली हरकत नाही, असे त्यांनी सांगितले. गेल्या 40 वर्षांपासून आपण पक्षाशी एकनिष्ठ आहोत व यापुढे राहू, असे सांगत खडसे म्हणाले की, लहान पणापासून अनेक कार्यकर्ते पक्षात काम करीत होते मात्र त्यांना आपण तिकीट दिल्यानेच त्यांना संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. मंत्री महाजन यांचे नाव न घेता खडसे म्हणाले की, पक्षात जे काही कार्यकर्ते आज मोठे झाले आहेत ते खडसेंमुळेच झाले आहेत. आपण त्यांना तिकीटाची संधी दिल्याने ते निवडून आले. पक्ष विस्तारासाठी यापुढेही आपले काम सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले.

मिडीयाकडे करमणूक म्हणून पाहतो : महाजन-खडसे गटाचा नेता मीच
जळगावातील विजयानंतर भुसावळातील खडसे गटाने जल्लोष का केला नाही? या प्रश्‍नावर खडसे म्हणाले की, खडसे काय की महाजन गट काय? दोन्ही गटाचा नेता नाथाभाऊच आहे. मिडीयाकडे आपण करमणूक म्हणून पाहत असल्याचे उपरोधिक टोला त्यांनी लगावला. भाजपातील बंडखोर मात्र खडसेंना मानणारे उमेदवार जळगावात पराभूत झाले याविषयी छेडले असता खडसे यांनी या प्रश्‍नाला बगल देत भाजपातर्फे जे 75 उमेदवार उभे होते ते खडसेंना मानणारे होते, असे सांगत त्यांनी या विषयावर पडदा टाकला. जळगावातील एमआयएम पक्षाने तीन जागा पटकावल्या याचा अर्थ त्यांना राज्य-राष्ट्रीय स्तरावर यश मिळाले, असे अजिबात नाही. हा पक्ष मुस्लीम धार्जिणा असल्याने त्यांना यश मिळाल्याचे ते म्हणाले. राज्यात या पक्षाने यश मिळवले असते तर निश्‍चित कौतुक वाटले आते, असेही ते म्हणाले.