‘होर्डिंग’ कारवाईचे धोरण ‘पुढचे’ सपाट…

0

गेल्या अडीच महिन्यांत 200हून अधिक अनधिकृत होर्डिंग काढली

अतिक्रमण निरीक्षकांची बघ्याची भूमिका की राजकीय दबाव?

पुणे : मंगळवारपेठेतील शाहीर अमर शेख चौकातील दुर्घटनेनंतर महापालिकेकडून शहरातील तब्बल 200हून अधिक अनधिकृत होर्डिंग गेल्या अडीच महिन्यांत काढण्यात आली आहेत. मात्र, महापालिका कारवाई करून पुढे जाताच ही होर्डिंग पुन्हा उभी राहात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या होर्डिंगबाबत अतिक्रमण निरीक्षकांना माहिती असूनही त्यांच्याकडून असे प्रकार पाठीशी घातले जात आहेत.

ऑक्टोबर महिन्यात मंगळवारपेठेत मालधक्का चौकात रेल्वेच्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंग कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर न्यायालय तसेच महापालिकेतील नगरसेवकांनी प्रशासनाच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते.

संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई?

यानंतर महापालिका प्रशासनाकडून गेल्या अडीच महिन्यांपासून शहरातील अनधिकृत होर्डिंगविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली होती. सुमारे 200 हून अधिक होर्डिंग जमीनदोस्त करण्यात आली; तसेच उंचीबाबत नवीन धोरण करून त्यानुसार उंचीवरील होर्डिंग जमिनीवर आणण्यात आली. तर, या दुर्घटनेनंतर दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणीत महापालिकेची न्यायालयाने कानउघडणी केल्याने, महापालिका प्रशासनाकडून क्षेत्रिय कार्यालयांचे प्रमुख सहायक महापालिका आयुक्तांकडे होर्डिंगची जबाबदारी दिली असून अनधिकृत होर्डिंग आढळल्यास संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे. असे असतानाही पालिकेने काढलेले होर्डिंग पुन्हा उभे केले जात असल्याचे समोर आले आहे.

कारवाई ठरली पोकळ

करण्यात आली होती. त्यामुळे त्यावेळी या कारवाईस कोणीही विरोध केला नाही. मात्र, आता पुन्हा नव्याने फलक लावताना, राजकीय दबाव येत असल्याचे पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून सांगण्यात येत आहे. धायरी उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या एका अनधिकृत फलकावर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी जाहिरात फलक उभारला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेने केलेली कारवाई पोकळ ठरली असून पुन्हा अनधिकृत होर्डिंग उभे राहण्यास सुरुवात झाल्याचेच चित्र दिसत आहे. एकदा कारवाई केली असल्याने पुन्हा करू नका, असे अधिकार्‍यांना तसेच आकाशचिन्ह विभागाच्या कर्मचार्‍यांना धमकावले जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी माहिती असून कारवाई होत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

तातडीने कारवाई होईल

कारवाई झालेल्या जागेवर पुन्हा होर्डिंग उभे राहाणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे या होर्डिंगवर तातडीने कारवाई केली जाईल. त्याबाबत संबंधित क्षेत्रिय कार्यालयाच्या आकाशचिन्ह निरीक्षकांना सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार, योग्य ती कारवाई केली जाईल, असे आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे उपायुक्त विजय दहिभाते यांनी सांगितले.