पंधरा दिवस उलटूनही रेल्वेकडून काम अपूर्ण; उच्चस्तरीय अधिकार्यांची चौकशी समिती स्थापन
पुणे : जुना बाजार परिसरातील चौकात होर्डिंग पडून चार जणांचा मृत्यू झाला तर, काहीजण गंभीर जखमी झाले होते. रेल्वे परिसरातील होर्डिंग असल्याने प्रशासनाकडून तातडीने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली. तसेच, पुढील पंधरा दिवसांत घटनेची चौकशी करून अहवाल सादर करू, असे सांगण्यातही आले होते. मात्र, पंधरा दिवस उलटूनही रेल्वेकडून अद्याप अहवाल पूर्ण करण्यात आलेला नाही.
शाहीर अमर शेख चौकात दि.5 ऑक्टोबर रोजी होर्डिंग दुर्घटना घडली. रेल्वेच्या परिसरातील होर्डिंग असून रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच ते पडले असल्याची टीका सर्व स्तरातून करण्यात आली. यामुळे घटनेची चौकशी करण्याकरीता अखेर दोन दिवसांनी रेल्वे प्रशासनाकडून उच्चस्तरीय अधिकार्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. यात मध्य रेल्वेचे उपमुख्य अभियंता ए. के. सिंग, उपमुख्य सुरक्षा अधिकारी शिवकुमार, उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक के. व्ही. थॉमस तसेच पुणे विभागातील वरिष्ठ सुरक्षा अधिकारी डी. विकास यांचा समावेश होता. यावेळी प्रशासनाकडून पुढील पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले होते. होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी रेल्वेकडून अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. याबाबत बरेचशे काम पूर्ण झाले आहे. मात्र, दुर्घटनेप्रकरणी दोन लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी समितीकडून प्रयत्न केले जात असून लवकरच अहवाल पूर्ण केला जाईल, अशी माहिती जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.