ॠषीवर्यांची शापवाणी

0

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील लोकप्रिय अभिनेता विनोद खन्ना याचे कर्करोगाच्या बाधेने निधन झाले. त्याविषयी त्या काळातील पिढीने अश्रू ढाळले आहेत. आजच्या माध्यमांनीही त्याच्या चढत्या काळाच्या कहाण्य सांगून आठवणी जागवल्या आहेत. मात्र, त्याच्याच पेशातील आजच्या पिढीला या माजी महान अभिनेत्याच्या निधनाचे दु:ख झालेले नसावे. अन्यथा तशी प्रतिक्रिया उमटली असती. आजच्या पिढीतील सुपरस्टार वा नावाजलेले अभिनेते जुन्या पिढीची किती कदर करतात, ते अनेकदा अनुभवास आलेलेच आहे. साहजिकच त्यापैकी कोणी अगत्याने विनोदच्या अंत्यविधीला हजेरी लावावी, अशी अपेक्षा करता येणार नाही. कारण जे क्षेत्रच देखाव्याचे आणि भ्रामक आहे, तिथे पाठ वळल्यानंतर कोणाविषयी आस्था दाखवण्याची अपेक्षा बाळगणेच चूक असते. कलाकार हा संवेदनशील असतो किंवा सृजनशील असतो, असल्या भंपक कल्पना माध्यमांनी सामान्य लोकांच्या मनात भरवलेल्या असतात. वास्तवात तोही एक पेशा असून, तेही मातीचेच बनलेले लोक असतात. पेशामुळे त्यांना असे उच्चस्थानी बसवलेले असते. त्यांच्याकडून कुठल्याही महान माणुसकीची अपेक्षा करणेच गैरलागू आहे. पण विनोदचा समकालीन कलावंत, ॠषीकपूरला हे मान्य नसावे अन्यथा त्याने अशा कोरडेपणाविषयी जाहीर तक्रार केली नसती. विनोदच्या अंत्ययात्रेला वा अंत्यदर्शनाला नव्या पिढीचे कोणी नावाजलेले कलाकार दिसले नाहीत, म्हणून ॠषीने शिव्याशाप दिलेले आहेत. ट्विटच्या माध्यमातून त्याने नव्या सुपरस्टार लोकांची हजामत केलेली आहे. या नव्या कलाकारांच्या संवेदनाशून्य वागण्यावर कोरडे ओढले आहेत. ह्या अनुभवातून गेल्यावर यातला कोणी आपल्यालाही खांदा द्यायला येणार नाही, अशी व्यथाही त्याने बोलून दाखवली आहे. मग ॠषी कुठल्या जमान्यात जगतो अशी शंका येते. कारण आजकाल अमानुषता हीच माणुसकी झाल्याचे त्याला ठाऊकच नाही काय?

विनोद खन्नाच्या मृत्यूने आजचे कलाकार व चित्रसृष्टी विचलित व्हावी, अशी या जाणत्या अभिनेत्याची अपेक्षा आहे. त्याचेही काही कारण असावे. आपल्या बालपणी पिता राज कपूर वा चुलता शम्मी कपूर यांच्यासह एकूण चित्रसृष्टी राष्ट्रप्रेम वा राष्ट्रद्रोहाच्या ज्या कल्पना घेऊन जगली वागली, त्याच्या जमान्यात ॠषी अजून रमला असावा. अन्यथा त्याने अशी अपेक्षा कशी केली असती? पन्नास साठ वर्षांपूर्वी देशाच्या हिताला कुठेही धक्का लागला, मग भारतीय कलाक्षेत्र रस्त्यावर येई आणि सैनिकांच्य समर्थनाला उभे रहात असे. देशविरोधी शब्द कुठे उच्चारला गेला, तर त्याचा निषेध करायला हे कलाकार जनतेच्या सोबत येऊन उभे रहात. चिनी युद्धाने विचलित झालेल्या कलाजगताने पंतप्रधान नेहरूंच्या डोळ्यात अश्रू येतील असे अजरामर गीत सादर केले होते. त्या बालपणात ॠषी रममाण होऊन गेलेला असावा. त्याला आज कलेची व संवेदनशीलतेची बदलून गेलेली व्याख्याच ठाऊक नसावी. आजकाल देशाच्या शत्रूंना कवटाळणे, त्यांच्या गळ्यात गळे घालून, भारतीय सैनिकांच्या हत्याकांडाविषयी तटस्थ राहण्याला संवेदनाशीलता म्हणतात, याचा थांगपत्ता याला लागलेला नसावा. तिकडे सीमेवर सैनिकांच्या माना कापल्या जातात आणि विद्यापीठ परिसरात भारताचे तुकडे होण्याचे नवस केले जातात. त्यांची पाठ थोपटण्याला आजकाल राष्ट्रप्रेम संबोधले जाते. अशा माणुसकी व संवेदनशील युगामध्ये आपलाच कोणी जुनाजाणता सहकारी मृत्युमुखी पडला असेल, तर त्याला श्रद्धांजली वाहायला जाण्यात कुठली आली माणूसकी? त्यापेक्षा कुठे दंगल हाणामारीत सामान्य मुस्लिम मारला गेला, म्हणून गळा काढायला रस्त्यावर येण्यातून माणूसकीचे प्रदर्शन होत असते. दादरी वा अलवारच्या घटनेसाठी अश्रू ढाळण्याला माणुसकी म्हणतात, नंतर कुठल्या रंगीत पार्टीला हजेरी लावून मौजही करायची मोकळीक असते.

कोण कुठला विनोद खन्ना? त्याला रोगबाधा झाली आणि निसर्गक्रमाने तो मरण पावला. त्याचे इतके कौतुक कसले? त्यापेक्षा भारताला शिव्याशाप देणारे वा भारतीय सैनिकांचे जीव घेणारे पाकिस्तानी असतील, त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्याला संवेदनशीलता म्हटले जाते आजकाल! किती कलाकार करण जोहरच्या त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सुरक्षा मिळावी म्हणून मैदानात उतरले होते, आठवते? ते चित्रपटाचे अविष्कार स्वातंत्र्य नव्हते. त्या चित्रपट कथेविषयी कोणाला आक्षेप नव्हता. त्यामध्ये कोणा पाकिस्तानी कलावंताला संधी दिली म्हणून आक्षेप होता. जो देश सतत भारतामध्ये हिंसाचार घडवून आणतो, शेकडो निरपराधांचे हकनाक बळी घेणारे घातपात घडवतो, त्याचाही निषेध करायला जे लोक राजी नसतात, त्यांना कलाकार म्हणतात. ते पाकिस्तानी असले तरी कलाकार असतात आणि अशा कलाकारांना भारतात संधी देणे, ही माणुसकी असते. तीच संवेदनशीलता असते. त्यापायी मारल्या जाणार्या सैनिकांच्या जीवाला कवडीचे मोल नसते आणि त्यामुळे उध्वस्त होणार्या त्यांच्या कुटुंबाची किंमत शून्य असते. हे हिशोब ज्यांना मांडता येतात व पटवून देता येतात, त्यांनाच संवेदनशील कलाकार मानले जाते आज या देशात! अशा देशात कलाकार म्हणून मान्यता हवी असेल आणि मेल्यावर कोणी खांद्या द्यावा असे वाटत असेल, तर देशाविषयी कमालीची तुच्छता अंगी बाणवावी लागेल. ज्यांना देशाविषयी काही आस्था नाही, त्यांना विनोद खन्ना नावाच्या आपल्याच दिवंगत सहकार्याविषयी कुठली आपुलकी असू शकते? त्याच्या अंत्यविधीत हजेरी लावून श्रद्धांजली वाहिली म्हणून कुठला मोठा गल्ला गोळा होणार आहे? जितके नामवंत करण जोहर वा शाहरुखच्या चित्रपटातील पाक कलावंतांच्या हक्कासाठी पुढे सरसावले होते, त्यापैकी कितीजण विनोदचे अखेरचे दर्शन घ्यायला आले होते? ॠषीभाई कुठल्या जमान्यात आहात?

आदल्या रात्री तमाम नावाजलेले कलाकार प्रियंका चोप्राच्या रंगीत आलिशान पार्टीत हजर होते. त्यात बहुतेक आजच्या ख्यातनाम कलाकारांचा भरणा होता. त्यापैकी बहुतांश कलाकार वरळीच्या स्मशानभूमीत बेपत्ता असल्याने ॠषीकपूर बेचैन झाला आहे. ते स्वाभाविकही आहे. त्याच्या जमान्यात इतकी तटस्थता वा संवेदनाशून्य स्थिती कलाक्षेत्रात आलेली नव्हती. संवेदना वा भावना इतक्या बाजारू झाल्या नव्हत्या, की मोजूनमापून व्यक्त केल्या जात नव्हत्या. भावना, आपुलकी वा संवेदना यांची तोलूनमापून खरेदीविक्री होत नव्हती. आजकाल प्रत्येक गोष्ट बाजारू झालेली आहे. कशाची किती किंमत मिळणार, यावर हजेरी लावली जात असते. ट्विटचेही पैसे घेतले जातात आणि समारंभ वा कार्यक्रमात उपस्थितीचेही पैसे कलाकारांना मिळत असतात. त्याची चर्चा होत नाही. भक्ती भावनांचे प्रदर्शन मांडण्याचेही पैसे व मोल घेणार्यांच्या जमान्यात, ॠषीकपूरला आपुलकीने अंत्यविधीला कोणी हजर राहावे असे वाटत असेल, तर तो मूर्खांच्या नंदनवनात वास्तव्य करत असला पाहिजे. खरेच कलाकार इतके भावुक व संवेदनाशील असते, तर सलमानखानच्या गाडीखाली चिरडून मेलेल्या कुणा पादचारी गरिबाच्या अंत्ययात्रेत दिसले असते आणि त्यापैकी कोणी सलमानला चित्रपटात घेतलाही नसता. फ़ार कशाला सामान्य माणूसही आता खूप निबर झाला आहे. त्यालाही अशा भावनांच्या जंजाळात फ़सण्याची गरज भासत नाही. खराखुरा सैनिक मेला त्याची फिकीर नसलेले भारतीय, करण जोहरच्या चित्रपटातल्या पाक कलाकाराचा अभिनय बघण्यासाठी तिकिटावर पैसे खर्च करू शकतात. कोणाकडून भावना वा आत्मीयता आस्थेची अपेक्षा करायची? तो जमाना मागे पडला ऋषीभाई! ॠषीमुनींच्या जमान्यातून भारत केव्हाच बाहेर पडला आहे. आता सत्य दुय्यम झाले असून, देखाव्याचा आविष्काराचा बाजार तेजीत आला आहे.