शिरपूर : आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांच्यासह पंचायत समिती सभापती, पं.स. सदस्य यांच्या प्रयत्नाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शिरपूर तालुक्यातील १२३६ वैयक्तिक सिंचन विहिरींच्या कामांना मंजूरी मिळाली आहे. प्रत्येकी ३ लाख रुपयांच्या या कामांच्या मंजूरीच्या आदेशांचे वाटप आ.अमरिशभाई पटेल, आ.काशिराम पावरा व मान्यवरांच्या हस्ते आमदार कार्यालयात करण्यात आले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यात असंख्य विकासकामे आणणार
शिरपूर तालुक्यातील आदिवासी बांधव व सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान बदलण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. शहर व तालुक्यातील जनतेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे नेहमीच प्रयत्न केले असून तालुक्यात असंख्य विकासकामे आणण्याचे काम सुरु असून अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. आमच्या प्रयत्नाने गरजू आदिवासी बांधवांना सिंचन विहीरींची मंजूरी मिळाली असून लाभार्थी बंधू भगिनींनी विहीरींचे काम पूर्ण करुन घ्यावे. शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून पाणी उपलब्धता मुबलक प्रमाणात झाल्याने विहीरींना त्याचा जलद फायदा होईल. वनजमिनीचे सर्वाधिक १० हजार पट्टे वाटपाचे काम शिरपूर तालुक्यात आपण केले आहे. कॉंग्रेसने गोरगरीबांच्या अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. प्रत्येकाने आपल्या सर्वांगीण विकासासाठी युवापिढीला चांगले शिक्षण द्यावे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. व्यसनामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाले असून युवा विढीने व सर्वांनी व्यसनापासून दूर रहावे असे आवाहन अमरिशभाई पटेल यांनी केले.
सर्वसामान्य जनतेसाठी काम सुरु
यावेळी आ. काशिराम पावरा म्हणाले की, तालुक्यात अतिशय जोमाने विकासाची कामे सुरु आहेत. शहरात व खेडोपाडी खाजगी स्वरुपात स्वतंत्रपणे विकास योजना आपल्या दारी राबविण्यात येत असून गोरगरीब व गरजू असलेल्या असंख्य नागरीकांचे, विधवा, निराधार स्त्री पुरुषांचे प्रस्ताव तयार करुन त्यांना लाभ मिळवून देण्यात येत आहेत. विकासकामे अखंडपणे करण्यात येत आहेत. धुळे जिल्हा परिषद व पंचायत शिरपूर समितीवर एकतर्फी सत्ता असल्याने त्यामार्फत अनेक योजना आणून आदिवासी बांधव तसेच तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी लाभ देण्याचा प्रयत्न करीत आहोत. सर्व कामांमध्ये पारदर्शीपणा असून राज्यात शिरपूर पॅटर्न व अनेक कामांबाबत चर्चा होते ही आनंदाची बाब आहे. तालुक्यात सर्वात जास्त संख्येने घरकुले मंजूर केले असून वनजमिनी पट्टे व लाभाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत असेही आ.काशिराम पावरा म्हणाले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी आ.अमरिशभाई पटेल, आ.काशिराम पावरा, नवनिर्वाचित नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, काँग्रेसकमिटीचे तालुकाध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, पंचायत समिती सभापती रुलाबाई पावरा, उपसभापती संजय पाटील, शहराध्यक्ष नितीन गिरासे, माजी सभापती गिलदार पावरा, माजी उपसभापती जगतसिंग राजपूत, जि.प.सदस्य दत्तू पाडवी, नारायण पावरा, पं.स.सदस्य उज्वल पाटील, पं.स.सदस्य विश्वास पावरा, पं.स.सदस्य सखाराम पावरा, कृउबा संचालक सत्तारसिंग पावरा, हिरालाल पावरा, अशोक कलाल उपस्थित होते.