यवतमाळ : पांढरकवडा भागात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात अखेर वन विभागाला यश आलं आहे. टी१ या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून वन विभागाचे कसोशीचे प्रयत्न सुरु होते. अखेर शुक्रवारी रात्री वन विभागाच्या बचाव पथकाने गोळी घालून या वाघिणीला ठार केलं. या वाघिणीने आत्तापर्यंत १४ जणांचा जीव घेतला आहे. दरम्यान ग्रामस्थांना वाघिणीला ठार केल्याची माहिती मिळताच त्यांनी फटाके फोडत, लाडू वाटून आनंद साजरा केला. आता लवकरात लवकर वाघिणीचे दोन बछडे आणि एक नर वाघ जेरबंद करा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
वाघिणीला ठार केल्याने आता आम्ही बिनधास्तपणे शेतात जाऊन काम करु शकतो, जनावरं चरण्यासाठी घेऊ जाऊ शकतो असं गावकऱ्यांनी म्हटलं आहे. या वाघिणीच्या दहशतीमुळे केळापूर, राळेगाव, कळंब या ठिकाणची शेतीची कामे ठप्प झाली होती. या तालुक्यांमध्ये वाघिणीनं धुमाकूळ घातला होता. पांढरकवडा वन विभागातील राळेगाव आणि पांढरकवडा या ठिकाणी या वाघिणीची सर्वात जास्त दहशत होती. लोणी, सराटी, खैरगाव, विहिरगाव, येडशी, मिरा, तेजनी या गावांमध्येही वाघिणीची चांगलीच दहशत होती. आता तिला ठार करण्यात आल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.