१ हजार ५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक; १२ हजार ६६८ ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती

0

मुंबई – राज्यातील एप्रिल, मे आणि जूनमध्ये मुदत संपलेल्या १ हजार ५६६ इतक्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात जुलै ते डिसेंबर २०२० दरम्यान प्रस्तावित असलेल्या १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

राज्यात एप्रिल, मे आणि जूनमध्ये १ हजार ५६६ ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. या काळात या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणे आवश्यक होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणे, निवडणुकीचे कामकाज, प्रचारसभा, मेळावे आदींचे आयोजन केले जाते. लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. यातून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन या ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तथापी, आता या ग्रामपंचायतींची मुदत संपली असून राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अजुनही कमी झालेला नाही. त्यामुळे लगतच्या काळात निवडणुका घेणे शक्य नाहीत. त्यामुळे या सर्व ग्रामपंचायतींवर शासनामार्फत प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. राज्यपालांच्या मान्यतेनंतर यासंदर्भात अध्यादेश काढण्यात येईल, असे ते म्हणाले.

१२ हजार ६६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित

राज्यातील कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव पाहता तो रोखण्याच्या अनुषंगाने राज्यात जुलै ते डिसेंबर २०२० दरम्यान प्रस्तावित असलेल्या १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती राज्य शासनामार्फत राज्य निवडणुक आयोगास नुकतीच करण्यात आली होती. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे, अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.
ज्या ग्रामपंचायतींची ५ वर्षांची मुदत संपेल तिथे विद्यमान कार्यकारिणी पुढे तशीच चालू न ठेवता त्या ठिकाणी मुदत संपण्यापूर्वी योग्य प्रशासकाची नेमणूक करण्याची दक्षता घ्यावी, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.