२५८ कोटींच्या वर्गीकरणाला सर्वसाधारण सभेची मान्यता !

0

राष्ट्रवादी, शिवसेना नगरसेवकांचा विरोध डावलून वर्गीकरणाचे प्रस्ताव मंजूर
विरोधक मतदानाची मागणी करत असताना महापौरांनी कामकाज नेले रेटून

पिंपरी-चिंचवड : महापालिकेत स्थानिक नगरसेवकांच्या हट्टापायी अंदाजपत्रकामधील उपलब्ध निधी पळविण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. वर्गीकरणाच्या 258 कोटी रुपयांच्या विषयाला उपसूचनांसह बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आली. दरम्यान, वर्गीकरणाचे विषय मागे घेण्यात यावेत, असे पत्र आयुक्तांनी दिले होते. परंतु, सत्ताधार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष करत वर्गीकरणाचे विषय मंजूर करुन घेतले आहेत. तर, विरोधक मतदानाची मागणी करत असताना महापौरांनी गोंधळातच विषय मंजूर केले. तर, भोसरी, इंद्रायणीनगर प्रभागातील रस्त्यांच्या कामावरील तरतूद शून्य करण्यात आली आहे. दरम्यान, उपसूचनांवरुन विरोधकांनी सत्ताधार्‍यांवर हल्लाबोल केला.

इंद्रायणीनगरात रस्त्याचा प्रस्ताव
जून महिन्याची तहकूब सभा बुधवारी पार पडली. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. 19 जूनला झालेल्या स्थायी समितीत आयत्यावेळी तब्बल 265 कोटी रुपयांच्या वर्गीकरणाचे विषय मंजूर केले होते. तसेच हे विषय महासभेकडे पाठविले होते. बुधवारी 20 रोजी झालेल्या महासभेत तातडीची बाब म्हणून वर्गीकरणाचे विषय आयत्यावेळी दाखल करुन घेतले होते. त्या विषयावर शुक्रवारी 22 रोजी झालेल्या महासभेत चर्चा झाली. त्यामध्ये भोसरी, इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक 8 मध्ये काँक्रीटकरणाचे रस्ते करण्यात येणार आहेत.

तरतूद केली शून्य
त्यासाठी 100 कोटी रुपयांची रकमेची तरतूद केली होती. या विषयावरुन सत्ताधारी भाजपच्या स्थानिक नगरसेवकांमध्ये तीव्र मतभेद आहेत. त्यावरुन स्थानिक नगरसेविका सीमा सावळे यांनी आयुक्तांना धारेवर धरले होते. त्यानंतर आयुक्तांनी वर्गीकरणाचे पाचही विषय मागे घेण्याचे पत्र दिले होते. परंतु, सत्ताधार्‍यांनी इंद्रायणीनगर येथील रस्त्याच्या कामाची तरतूद शून्य केली. उर्वरित चार विषय विरोधकांचा विरोध डावलून मंजूर केले. मंजूर झालेले विषय चिंचवड मतदार संघातील असून विशिष्ट नगरसेवकांच्या प्रभागातील आहेत.

एकाच विषयावर मतदान
20 नंबरच्या विषयावर विरोधकांनी मतदानाची मागणी केली. त्यावर उपसूचनेसह मंजूर करण्याच्या बाजूने 66 तर विरोधाच्या बाजून 37 मतदान झाले. महापौरांनी हा विषय मंजूर केला. त्यानंतर लगेच 21 क्रमांकाचा विषय देखील मंजूर केला. त्याला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोधाची भूमिका घेत महापौरांसमोर हौदात धाव घेतली. राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, या गोंधळातच महापौरांनी विषय रेटून मंजूर केले. सभा संपल्यानंतर विरोधकांनी सभागृहात भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.