३११ दिव्यांगांना कृत्रिम अवयवाचे वाटप

0

पुणे – केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सहकार मंत्रालय व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ३११ दिव्यांगांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांच्या हस्ते कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे आज मोफत वाटप करण्यात आले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला देशातील नागरिकांना व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य करण्याच्या सूचना अर्थ मंत्रालयाने बँकाना दिल्या आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने बँकांना तब्बल दोन लाख कोटी रुपये दिले असल्याचे सांगितले.

मुद्रा योजनेचा देशातील १३ कोटी नागरिकांना लाभ झाला आहे. मुद्रा योजनेबाबत काही तक्रारी येत आहेत, याची अर्थमंत्रालयाने गंभीर दखल घेतल्याचे त्यांनी सांगितले. अपंगांना ‘दिव्यांग’ नागरिक म्हणून संबोधण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी सांगितले. देशाचे पैसे घेऊन काही लोक पळून गेले. परंतु, या लोकांना भाजप सरकारच्या नव्हे तर युपीए सरकारच्या राजवटीत पैसे दिले गेले आहेत, असा शुक्ला यांनी आरोप केला. हे सगळे युपीए सरकारचे पाप असून आजही आम्ही ते धुण्याचे काम करत आहोत, असेही ते म्हणाले. खासदार अमर साबळे म्हणाले, ‘अपंगत्वावर मात करून जगण्याची दिव्यांगांची जिद्द वाखणण्याजोगी आहे. ज्यांची पत नाही, त्याची पत निर्माण करण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांनी मदत करावी, अशी त्यांनी बँक अधिकाऱ्यांना सूचना केली.

मुद्रा लोनसाठी अर्ज

दिव्यांग नागरिकांना पेन्शन देणारी पिंपरी चिंचवड महापालिका ही देशातील पहिली महापालिका आहे. दिव्यांग नागरिकांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. ही पेन्शन योजना १८ वर्षाखालील मुलांनादेखील लागू असल्याची त्यांनी माहिती दिली. राष्ट्रीयकृत बँकांच्यावतीने दिव्यांगांना मुद्रा लोनसाठी अर्ज वाटप करण्यात आल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.

आकुर्डी येथील साई उद्यानात झालेल्या कार्यक्रमाला गिरीश बापट, पिंपरी चिंचवड पालिकेचे महापौर नितीन काळजे, महेश लांडगे, भाजपच्या प्रदेशच्या नेत्या उमा खापरे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, सदाशिव खाडे, पालिकेचे प्रभारी आयुक्त किरण गित्ते, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, प्रवीण अष्टीकर, सहायक आयुक्त स्मिता झगडे आदी उपस्थित होते.