३५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर १३ हजार कोटी जमा

0

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची विधानसभेत माहिती

मुंबई: राज्य छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात कर्जमाफी अंतर्गत राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर आतापर्यंत 13 हजार कोटी रुपये जमा केले असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी विधानसभेत दिली. विरोधी पक्षाच्या वतीने नियम 293 अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना देशमुख बोलत होते. यावेळी मंत्री सुभाष देशमुख आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात चांगलाच शाब्दिक कलगीतुरा रंगला.

यावेळी ते म्हणाले, राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांमध्ये पात्र अपात्र शेतकरी आपण ठरवले आहेत. निकषानुसार ऑनलाईन 77 हजार 29 हजार शेतकऱ्यांनी फॉर्म भरले आहेत. शेतकऱ्यांचे कौतुकच आहे. शेतकऱ्यांनी भरलेली माहिती बँकेला न देता, बँकेकडून यादी मागून घेतली. पहिल्या यादीनुसार 55 लाख शेतकऱ्यांची यादी बँककडे दिली आहे. 46 लाख 52 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. माझ्या माहितीनुसार 2008 ची कर्जमाफी ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केली होती. मात्र, आम्ही कर्जमाफी शेतकरी डोळ्यासमोर ठेवून केली आहे. 35 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर 13 हजार कोटी रुपये आतापर्यंत जमा केले असल्याचे सुभाष देशमुख यांनी सांगितले.

सुभाष देशमुख पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या यादी सीडीच्या स्वरूपात पटलावर ठेवण्यात येईल. तुमच्या काळातले काहीही बोलले मागचे का काढता म्हणता अन् आमचे मात्र सगळे काढता असा तक्रारीचा सूर सुभाष देशमुख यांनी लावताच बसल्या जागेवरुनच अजित पवार यांनी आम्ही काढणारच ! तुम्ही सरकारमध्ये आहात तर आम्ही बोलणारच, असा पलटवार केला. त्यावर पलटवार करत सुभाष देशमुख म्हणाले, “तुम्ही बोला पण आम्हीच शेतकऱ्यांना न्याय देणार. शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न आम्ही सोडवणारच अशी ग्वाही देशमुख यांनी दिली.