पुणे : कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचारांसाठी कोंढाव्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट येथील सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या ६० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज सोमवारी घडली. गुंडाप्पा शेवरे (वय ६०, रा. चैत्रबन वसाहत, बिबवेवाड) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शेवरे आणि त्यांचा मुलगा हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारांसाठी कोंढव्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. या दोघांवर ४ जुलैपासून उपचार सुरू होते. या दोघांना ठेवलेल्या खोलीमध्ये आणखी दोन रुग्णांना ठेवण्यात आलेले आहे. एकूण चार जण या खोलीत ठेवण्यात आलेले आहेत.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत.