नंदुरबार। लोकप्रतिनिधींच्या इच्छा शक्ती अभावी प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. धुळे नंदुरबार जिल्ह्यातील 90 गावांचा प्रश्न असलेल्या या योजनेच्या कामाला गती न मिळाल्यास येत्या लोकसभा, विधान सभा निवडणुकीत शेतकरी बहिष्कार टाकतील असा इशारा प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजना संघर्ष समितीचे निमंत्रक सतीश पाटील यांनी नंदूरबार येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
प्रकाशा बुराई योजना पुर्ण होण्यासाठी समितीच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून आमचा संघर्षमय पाठपुरावा सुरू आहे. पण शासन स्तरावरून या कामाला गती मिळताना दिसत नाही, आंदोलन केले म्हणून तूट पुंज निधी देऊन शेतकऱ्यांचे आसू पुसण्याचे काम शासन करीत आहेत. मंत्री जयकुमार रावल ,गिरीश महाजन,आमदार डॉ. विजय कुमार गावीत, यांनी ठरविले तर निधी मिळू शकतो. मात्र या नेत्यांकडून देखील आशेचा किरण दिसत नाही. त्यासाठी संघर्ष समितीलाच आता गंभीर स्वरूपाचे आंदोलन करावे लागणार आहे, ते करूनही या योजनेचा प्रश्न सुटला नाही तर सिंचनाखाली येणाऱ्या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना जागृत करणार आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असा इशारा सतीश पाटील यांनी दिला आहे. यावेळी मनोहर देवरे,चंद्रकांत पाटील, भगवान पाटिल, रवींद्र माळी, सुनील पाटील,सुरेश शिंत्रे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.