९२ व्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी लेखिका अरुणा ढेरे !

0

यवतमाळ- यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखिका आणि कवयित्री अरुणा ढेरे यांच्या नावावर एकमत झाले आहे. संमेलनाध्यक्षपदी पाचव्यांदा महिला विराजमान होणार आहे. ११ ते १३ जानेवारीदरम्यान यवतमाळमध्ये संमेलन होत आहे. संमेलनाध्यक्षपदी कोण असेल याबाबत साहित्य वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. अमरावतीच्या ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांचे नावही अध्यक्षपदासाठी आघाडीवर होते. प्रभा गणोरकर यांनी याआधीही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नशीब आजमावून पाहिले होते.

साहित्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष या चारच साहित्यिका संमेलनाध्यक्षपद भूषवू शकल्या आहेत. १९६१ साली ग्वाल्हेर येथील संमेलनाचे अध्यक्षपद कुसुमावती देशपांडे, १९७५ साली कराड येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद दुर्गा भागवत, १९९६ साली आळंदी येथील संमेलनाचे अध्यक्षपद शांता शेळके आणि २००१ साली इंदोर येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद विजया राजाध्यक्ष यांनी भुषवले होते. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी २०१८ सालच्या यवतमाळ येथील संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ महिलेच्या गळयात पडणार का, याबाबत चर्चांना उधाण आले होते.