तेल रस्त्यावर सांडल्याने लाखोंचे नुकसान
अनेकांनी साधला स्वार्थ
नवापूर : शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील गुजरात राज्यातील उच्छल भागातील भडभुंजा रस्त्यावर खाद्यतेलाने भरलेला टँकर उलटल्याची घटना सोमवारी, 22 रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली. अचानक झालेल्या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. टँकरमधील तेल रस्त्यावर सांडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली. टँकरच्या संबंधित कंपनीला अपघाताविषयी माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
टँकरमधून खाद्य तेल गळती होऊन संपूर्ण खाद्यतेल रस्त्यावर येऊन ते पाण्यासारखे वाहत होते. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घरातून मिळेल त्या भांड्यात तेल भरून घेण्यासाठी गर्दी केली होती. तेही भरण्यावरुन घटनास्थळी वाद झाल्याचा प्रकार पहावयास मिळाला. खाद्यतेल रस्त्यावर आल्यामुळे अनेक वाहने स्लीप झाल्याने अपघात झाल्याचे चित्र होते. खबरदारीची उपाययोजना म्हणून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांनी अनेकांना रोखले तर काहीना पांगवले. तरी अनेकांनी टँकरमधून तेल घेऊन आपला स्वार्थ साधून घेतला.
भंडभुंज रस्त्यावर अपघात झाला असून टँकरमधील तेल रस्त्यावर आल्याने वाहने सावकाश चालवा असा संदेशही सोशल मीडियावर फिरवून अनेकांनी चालकांना सावधान केले. खबरदारी म्हणून त्या रस्त्यावर दूरपर्यंत सूचना देण्यात येत होत्या. भला मोठा खाद्यतेल भरलेला टँकर उलटल्याने रस्त्यावर दुतर्फा मार्ग ठप्प झाला होता. रस्त्यावरील खड्डे व तीव्र उष्मा यामुळे अपघात झाल्याचा अंदाज लावला जात आहे.
Next Post