तक्रारदारकडून 90 हजाराची केली होती मागणी
धुळे लाचलुचपत विभागाची कामगिरी
धुळे : तक्रारदाराच्या सेवानिवृत्तीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यासाठी 90 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून लाचेचा पहिला हप्ता म्हणून 30 हजार रूपये घेणार्या संस्थाचालकास आणि संस्थेतील वरिष्ठ लिपिकास अॅन्टी करप्शनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शुक्रवारी, 26 रोजी सकाळी करण्यात आली. दरम्यान, एका संस्थाचालकासह वरिष्ठ लिपिकास 30 हजार रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
तीर्थदास सुखदेव अहिरे (57, हुद्दा : मुख्याध्यापक / सचिव /संस्था चालक – गांधी व फुले (तांत्रिक) विद्यालय, खेडे, ता.जि. धुळे) आणि अनिल नवल सोनवणे (48, हुद्दा : वरिष्ठ लिपिक) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी धुळयात राहणार्या 58 वर्षीय शिक्षकाने अॅन्टी करप्शनकडे तक्रार दिली होती.
तक्रारदार शिक्षकाचा सेवानिवृत्तीचा प्रस्ताव त्यांनी अनिल सोनवणे यांना सादर केला होता. त्यावेळी सोनवणे यांनी संस्थाचालक अहिरे यांच्याशी भेटण्यास सांगितले. अहिरे यांनी तक्रारदारास तो प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यासाठी 90 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून ती तीन टप्प्यात सोनवणे यांच्याकडे देण्यास सांगितली. तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्यांनी अॅन्टी करप्शनकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. शुक्रवारी सापळा रचल्यावर सरकारी पंचासमक्ष अहिरे यांच्या सांगण्यावरून सोनवणे यांनी तक्रारदाराकडून 30 हजार रूपयाची लाच स्विकारली. त्यानंतर अहिरे आणि सोनवणे यांना ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पोलीस उपाधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर यांच्यासह पथकाने केली.