जळगाव: जिल्ह्यातील कोरोना बंधीतांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात तपासणी संख्या वाढविण्याची मागणी होत आहे. तपासणीनंतर अहवाल येण्यास दोन ते तीन दिवसांचा विलंब लागत असल्याने संसर्ग वाढत आहे. मात्र अँटीजेन कीटद्वारे तपासणी केल्यास अहवाल अर्ध्यातासात येत असल्याने संसर्ग कमी करण्यात मदत मिळते. जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागासाठी अँटीजेन कीट खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली होती. निधी उपलब्ध करून देण्यात आला असून २० लाखांचा धनादेश जि.प.अध्यक्षा रंजना पाटील यांच्याहस्ते जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे. यावेळी उपाध्यक्ष लालचंद पाटील, आरोग्य सभापती रविंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद गायकवाड, प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ.पांढरे आदी उपस्थित होते.
जळगावातील ग्रामीण भागात जलद गतीने तपासणी व्हावी यासाठी अँटीजेन कीट खरेदी करणे आवश्यक आहे. त्यासाठी निधीची मागणी होत होती. आता निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने लवकरच अँटीजेन कीट खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. अँटीजेन कीटमुळे ग्रामीण भागातील रुग्णांची तपासणी तातडीने करण्यात येऊन उपचार करण्यास मदत मिळणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांना कीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांच्याकडे कीट उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.