जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रासायनिकशास्त्र प्रशाळेने अंकलेश्वर येथील हेबॅच कलर प्रा.लि. (एचसीपीएल) या कंपनी समवेत सामंजस्य करार केला असून शनिवार 27 मे रोजी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या. एचसीपीएल ही कंपनी रंगद्रव्य उद्योगात जागतिक पातळीवर प्रसिध्द आहे. या करारान्वये पीव्हीसी स्टेबिलायझर्स् विकसित केले जाणार आहे.
गेल्या वर्षभरापासून एचसीपीएल समवेत पृथ:करणा पूरते काम सुरु होते. आता पीव्हीसी स्टेबिलायझर्स् विकसित करण्यासंदर्भात प्रकल्प तयार करण्यात आला आहे. त्यासाठी रासायनिकशास्त्र प्रशाळेचे सहाय्य व मार्गदर्शन घेतले जाणार आहे. या कराराची मुदत पाच वर्षांसाठी असून वेळोवेळी यासंदर्भातील कामाचा आढावा घेतला जाणार आहे. या सामंजस्य कराराच्या वेळी प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी, विशेष कार्य अधिकारी प्रा.पी.पी.माहुलीकर, प्रशाळेचे संचालक प्रा.डी.एच.मोरे, डॉ.विकास गिते, कंपनीच्या वतीने डॉ.वरिंदर वाढवा, योगेश यादव, निरंजन कुलकर्णी यांची उपस्थिती होती.