अंगठा नाही, आता मी ‘सही’ करणार!

0

सही साक्षर झालेल्या भाजेतील ज्येष्ठ नागरिकांचा विश्‍वास

लोणावळा : ‘अंगठा नाही, आता सही करणार’ असा विश्वास सही-साक्षर झालेल्या ग्रामीण भागातील भाजे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला. जागतिक साक्षरता दिनानिमित्त भाजे (ता. मावळ) येथील श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालयात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात सही साक्षर झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपण आता सही साक्षर झाल्याचे इतरांनाही सही साक्षर होण्यासाठी प्रेरीत करू, असा विश्‍वास व्यक्त केला.

35 ज्येष्ठांनी पूर्ण केले उद्दिष्ट
साक्षरता मोहीम उपक्रमांतर्गत घरातील निरक्षर ज्येष्ठ व्यक्तींना साक्षर करण्याचे उद्दिष्ट स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. त्यात स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांमुळे 35 ज्येष्ठांनी ‘सही-साक्षर’ होण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले. त्यापैकी सुशिला तिकोणे, जिजाबाई तिकोणे, हौसा कोंडभर, नाजरीन शेख, रमाबाई जाधव, अनुसया आंबेकर व बबन घोजगे यांचा समारंभात सन्मान करण्यात आला. प्राचार्य प्रकाश सरवदे व पर्यवेक्षिका वर्षा क्षीरसागर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

नातवांकडून शिकायला आनंद
या वयात नातवांकडून शिकायला खूप आनंद मिळतो, असे बबन घोजगे यांनी यावेळी सांगितले. आपल्या निरक्षर पालकांना लिहायला-वाचायला शिकवणार्‍या स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती व पालकांना पुरस्काराची घोषणादेखील यावेळी करण्यात आली. स्काऊट शिक्षक संतोष तळपे यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात आला. पालकांनी सहकार्य केल्यास लवकरच या मोहिमेस यश मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. शिक्षक निधान वर्धे, योगेश कोठावदे, जयवंत सिसोदे, श्रीराम तांदळे यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले.