अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा

0

जळगाव। जिल्ह्यातील राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध मागण्यासाठी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा नेण्यात आला. अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मागण्यांमध्ये इतर राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचार्‍यांना मानधन, अंगणवाडी कर्मचार्‍यांना मिळणार्‍या सेवा समाप्ती लाभामध्ये सुधारणा, अंगणवाडी कर्मचार्‍यांना भविष्यनिर्वाह निधी लागू करण्यात यावा. आजारपणाची रजा तसेच उन्हाळी सुटी भरपगारी लागू कराण्यात यावी या मागण्या होत्या. सोमवारी 17 रोजी कर्मचार्‍यांनी जिल्हा परिषद भवनावर धडक मोर्चा नेत आंदोलन केले.

दोन लाख सेविकांची मागणी
राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेतंर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका, मदतनिस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधन वाढविण्याबाबत शासनाने आश्‍वासन दिले आहे. परंतू, अद्यापपर्यंत मानधन वाढ झाली नसल्याने याकरीता अंगणवाडी सेविकांनी वारंवार प्रशासनाकडे मागणी केली आहे. अनेकवेळा संप पुकारण्यात आल. अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. मात्र तोंडगा निघत नसल्याचे दिसून येत आहे.

हजारोंच्या संख्येने उपस्थिती
अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधन वाढीसाठी शासनाकडे वेळोवेळी मागणी करून देखील दुर्लक्ष करण्यात आले आहे. कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने राज्यातील सर्व जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्याचे निश्‍चित केले होते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांनी जिल्हा परिषदेवर दुपारी बाराला मोर्चा काढून लक्ष वेधले.

मुंबई येथे महामोर्चाचा इशारा
विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला असून, या मागण्या मान्य न झाल्यास 4 ऑगस्टला राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचार्‍यांचा आझाद मैदान मुंबई येथे महामोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात येऊन सप्टेंबर महिन्यांपासून अंगणवाडी केंद्र बंद करून बेमुदत संपावर जाणार आहे. रामकृष्ण पाटील, युवराज बैसाणे यांच्यासह सुषमा चव्हाण, मंगला नेत्रे, मिनाक्षी चौधरी, पुष्पा गवळी, पुष्पा परदेशी, सविता महाजन, साधना पाटील आदींचे सहकार्य लाभले.