अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या संपात सहभागी होण्याचे आवाहन

0

मानधन वाढीसह इतर विविध मागण्या

जळगाव । महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या सेवा लक्षात घेऊन तसेच महागाईचा विचार करुन कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ करण्यात यावे याप्रमुख मागण्यासह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचार्‍यानी आज 11 सप्टेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी कर्मचार्‍यांनी संपात सहभाग घ्यावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)तर्फे करण्यात आले आहे. शहरातील शामा प्रसाद मुखर्जी उद्यानात संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात कर्मचार्‍यांना आवाहन करण्यात आले. 11 सप्टेंबर पासून बेमुदत संप पुकारण्यात येत असून संपकाळात सर्व शासकीय बैठकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 12 रोजी चलो मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे.

अध्यक्ष अमृतराव महाजन यांचे मार्गदर्शन
गेल्या तीन वर्षापासून कर्मचार्‍यांना वेळेवर मानधन मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी कृतीसमितीच्या झेंड्याखाली सर्व संघटना एकत्र येऊन संपात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपाचा दखल शासनाला घ्यावे लागणार असून संप यशस्वी होईल असा आत्मविश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी अध्यक्ष कॉ.अमृतराव महाजन यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी यावेळी संघटनेच्या वाटचालीविषयी व संपकाळातील वाटचलीविषयी मार्गदर्शन केले.

12 रोजी मुंबईत आंदोलन
राज्यातील 2 लाख अंगणवाडी सेविकांनी संप पुकारलेला आहे. अंगणवाडी कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी मुंबई येथे महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला असून जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई येथे जाण्यासाठी सोमवारी सायकांळ पर्यत रेल्वे स्टेशनवर जमावे असे आवाहन करण्यात आले आहे. प्रेमलता पाटील यांनी आभार मानले.

यांची होती उपस्थिती
शहरात आयोजित मेळाव्याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष ताराबाई बनसोडे (औरंगाबाद) यांनी मार्गदर्शन केले. उर्जा सपकाळे, मिना काटोले, अरुणा पवार, उषा सपकाळे, प्रतिभा नारखेडे, चंद्रकला चिंचोडे, मिना पाटील, निर्मला कोळी, सुशिला सपकाळे, शालीनी बेंडाळे, सुरेखा पाटील, रंजना माळी, छाया माळी, संतोष कुंभार, ममता महाजन, आशा सपकाळ यांच्यासह पाचशे अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.