जळगाव । अंगणवाडी कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येणार होते. परंतू 10 रोजी झालेल्या बैठकीत थकीत मानधन अदा करण्याचा निर्णय झाल्याने आंदोलन तहकुब करण्यात आले. त्यानंतर डॉ.शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात जिल्हा मेळावा घेण्यात आला. यावेळी कर्मचार्यांच्या विविध प्रश्न, समस्यांवर चर्चा करण्यात आली. जिल्हयातील अंगणवाडी कर्मचार्यांना जुन 2017 पासूनचे थकीत मानधन देण्यात यावे. अंगणवाडी केंद्रासाठी लागणारी स्टेशनरी व दप्तर पुरविण्यात यावे, अंगणवाडी सेविकांकडून दप्तरासाठी 600 ते 800 रुपये येणार्या मुख्यसेविका व प्रभारी बालविकास प्रकल्पधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. अमळनेर, पारोळा, यावल, रावेर, पाचोरा या प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांकडून घेलेले 600 ते 800 रुपये विनाविलंब परत करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
15 दिवसात वेतन
सेविकांच्या रिक्त जागा पात्र व अनुभवी मदतनिसांमधून ताबडतोब भरण्यात याव्यात, पीएफएमएस मार्फेत दरमहा वेळेवर मानधन अदा करण्यात यावे यासह इतर जिल्हास्तरीय प्रश्नांकडे जिल्हा परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने जि.प समोर आंदोलन करण्यात येणार होते. परंतू महिला व बालविकास अधिकारी यांनी संघटनेसोबत बैठक घेवून ज्या कर्मचार्यांचे पीएफएमएसद्वारे मानधन मिळालेले नाही अशा कर्मचार्यांना येत्या 15 दिवसांत थकीत मानधन अदा केले जाईल असे सांगितले.
खर्चाचा निधी प्राप्त
गणवेश व सादील खर्चासाठीचा लागणारा निधी जि.प.ला प्राप्त झालेला असून तो त्वरीत अदा केला जाईल असे आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यानंतर संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा घेण्यात आला. यावेळी महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.आर.तडवी, सहाय्यक प्रशासन अधिकारी डी.एस.पाटील तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यासह अंगणवाडीसेविका मोठया संख्येने उपस्थित होत्या.