अलिबाग : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी घोषणा देत संतप्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परीषेवर मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा यांनी केले होते. या मोर्चेकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा परीषदेचे महिला व बालकल्याण अधिकारी यांना दिले. राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत कार्यरत सुमारे 2 लाख अंगणवाडी सेविका, मदतनिस मीनी अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ होण्याबाबत शासनाने वेळोवेळी अश्वासन दिलेले आहे. परंतू आजतागायत शासनाने अंगणवाडी कर्मचार्यांच्या मानधन वाढीच्या निर्णयाबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. मागासलेल्या आसाम, त्रिपुरा या राज्यातील अंगणवाडी कर्मचार्यां पेक्षा महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी कर्मचार्यांमध्ये प्रचंड नाराजी व असंतोष आहे, असा मोर्चात सहभागी झालेल्यांचा सूर होता.
सेवा समाप्ती लाभामध्ये सुधारणा करण्याची मागणी
अंगणवाडी कर्मचार्यां ना मिळणार्या सेवा समाप्ती लाभामध्ये सुधारणा करुन जास्त सेवा, जास्त लाभ याप्रमाणे सेवा समाप्ती लाभ देण्यात यावा, केंद्र सरकारने 8 मार्च 2017 रोजी जाहीर केल्याप्रमाणे अंगणवाडी सेविका, मदतनिस व मीनी अंगणवाडी सेविकांना भविष्य निर्वाह निधी लागू करण्यात यावा, अशा मोर्चेकर्यांच्या मागण्या होत्या. अंगणवाडी कर्मचार्यां ना इतर शासकीय कर्मचार्यांप्रमाणे आजारपणाची रजा तसेच उन्हाळी सुट्टी भर पगारी लागू करण्यात यावी. मीनी अंगणवाडी केंद्रांचे नियमित अंगणवाडी केंद्रात रुपांतर करण्यात यावे, याही मागण्या अंगणवाडी सेविकांनी जिल्हापरीषदेकडे केल्या आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे मार्गदर्शक शाम म्हात्रे, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या सरचिटणीस शुभांगी पालशेतकर, सविता दरेकर, तेजश्री जाधव, आशा गोरे, सुनंदा देशमुख, रंजना संसारे, वनश्री गायकवाड, अंजली जाधव आदि उपस्थित होते.