अंगणवाडी सेविकांचा विराट मोर्चा जि.प.वर धडकला !

0

युती सरकार विरोधात घोषणाबाजी; मागण्यांसंदर्भात दिले निवेदन

जळगाव: अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे समायोजन रद्द करावे, मोबाइल वापराची सक्ती नको यासह इतर मागण्यांसाठी मंगळवारी १६ रोजी जिल्हा परिषदेवर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा विराट मोर्चा जि.प.वर धडकला. जिल्ह्याभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी हजारोंच्या संख्येने यात सहभाग नोंदविला. शिवतीर्थ मैदानावरून संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेशवर , कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील, युवराज बैसाणे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येऊन विविध मागण्यांचे निवेदन महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.आर. तडवी यांना देण्यात आले.

यांचा होता सहभाग
मोर्चात मीनाक्षी चौधरी, मंगल नेवे, चेतना गवळी, सविता महाजन, पुष्पक परदेशी, संगीता निभोरे, शकुंतला चौधरी, रेखा नेरकर, रामा आहिरे, आशा जाधव, सुंनदा नेरकर, उज्वला पाटील, साधना पाटील, वंदना कंखरे, सुनीता नेरकर , सविता वाघ , ज्योती पाटील, सुलोचना पाटील, सुरेखा मोरे, मीना गढरी, नीता सपकाळे, बेबी पाटील,शोभा जवरे , सारला पाटील, आक्का सपकाळे, नंदादेवरे आदी उपस्थित होते.

निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा
युती सरकार हाय हाय,…या सरकारचं करायचं काय? खली डोकं वरती पाय…, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणाबाजीने मोर्चेकऱ्यांनी जिल्हा परिषद परिसर दणाणून सोडले. आमच्या मागण्यांसंदर्भात शासनाने योग्य निर्णय घेतला नाही तर आगामी काळात विधानसभा निवडणुकीपूर्वी यापेक्षाही मोठा मोर्चा काढला जाईल, तसेच विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा देण्यात आला आहे.