पुणे । अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे काम कवडी मोलाचे समजले जाते मात्र या देशाच्या विकासदूत आहेत. आपण करत असलेल्या कामाला योग्य दाम मिळावे यासाठी अंगणवाडी सेविकांनी सुरू केलेला संघर्ष ही त्यांची आत्मसन्मानाची लढाई आहे. असे मत अंगणवाडी कर्मचारी सभेचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन पवार यांनी केले.
महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी पवार बोलत होते. संघटनेच्या सचिव रजनी पिसाळ, महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाचे निलेश दातखिळे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
‘मानधन नको दयेचे-वेतन हवे हक्काचे’
पवार म्हणाले की, सेविका,मदतनीस या सर्व स्त्रियाच असल्याने त्या कितीही महत्त्वाचे काम करत असल्यातरी स्त्रियांचे काम म्हणून ते दुय्यम समजले जाते. म्हणून मानधानवाढ ही केवळ आर्थिक मागणी नसून ती आत्मसन्मानाचीही आहे. मानधनवाढ व इतर मागण्यांसाठी 11 सप्टेंबरपासून राज्यातील अंगणवाड्यांचा बेमुदत बंद सुरू आहे. त्या अंतर्गत सोमवारी राज्यभर विभागीय महिला बाल विकास उपायुक्त कार्यालय व जिल्हा परिषदांवर मोर्चे काढण्यात आले. सकाळी साडेअकरा वाजता ससून जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. समाजकल्याण आवारातील महिला व बाल विकास उपायुक्त कार्यालय व नंतर पुणे जिल्हा परिषदेवर गेला. मोर्चात हजारो अंगणवाडी सेविका मदतनीस सहभागी झाल्या होत्या. ‘मानधन नको दयेचे-वेतन हवे हक्काचे’, ‘भाऊबीज नको-बोनस हवा’, ‘टीएचआर बदल झालाच पाहिजे’ घोषणा देण्यात आल्या. जिल्हा परिषदेवर शिवसेना गटनेत्या आशा बुचके, देवराम लांडे व महिला बाल विकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे हे मोर्चाला सामोरे गेले. बुचके व लांडे यांनी मागण्यांना पाठिंबा दर्शवला. तसेच जिल्हा परिषदेच्या पातळीवर अंगणवाडीताईंसाठी आरोग्य योजना सुरू करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.