अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढणार?

0

पुणे : महापालिकेकडून अंगणवाडी सेविका व बालवाडी शिक्षिकांना देण्यात येणारे मानधन कमी असल्याने त्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर शिक्षिकांना 22 हजार तर, सेविकांना 17 हजार रूपये मानधन देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडून प्रशासनाच्या अभिप्रायासाठी पाठविण्यात आला आहे. मागील स्थायी समितीमध्येही अशाच प्रकारचा प्रस्ताव आला होता, त्यामुळे या दोन्ही प्रस्तावांचा अभिप्राय पुढील आठ दिवसांच्या आत सादर करण्याच्या सूचना यावेळी प्रशासनास देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महापालिकेच्या शाळांमध्ये 521 बालवाडी शिक्षिका असून 450 बालवाडी सेविका आहेत. महापालिकेकडून सद्यस्थित शिक्षिकांना दरमहा 8 हजार 500 तर, सेविकांना 6 हजार 250 रूपयांचे मानधन दिले जाते.मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याबरोबरच जनगणना, मतदार नोंदणी, पल्स पोलिओ मोहीम तसेच पालिका व शासनाच्या इतर सर्वेक्षणाची कामे दिली जातात. अशा स्थितीत या सेविकांना मिळणारे मानधन हे अतिशय तुटपुंजे आहे. ही बाब लक्षात घेता राज्यातील इतर महापालिकांमध्ये शिक्षिका व सेविकांना मिळणारे वेतन लक्षात घेऊन बालवाडी शिक्षिकांना 22 हजार तर, सेविकांना 17 हजार रूपयांचे मानधन देण्यात यावे. तसेच रजा व वैद्यकीय सुविधाही देण्यात याव्यात, अशी मागणी या प्रस्तावात करण्यात आली होती.