अंगणवाडी सेविकांच्या पगारवाढीसाठी प्रयत्न

0

पुणे । सध्या जिल्ह्यात अंगणवाड्यांच्या संदर्भात अस्थिरतेचा प्रश्‍न भेडसावू लागला असून देशामध्ये महिलांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे मी अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी असून त्यांच्या पगारवाढीसाठी प्रयत्नशील असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. दौंड तालुक्यातील केडगाव-चौफुला येथील बोरमलनाथ मंदिर परिसरात आयोजित आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या.

दौंड पंचायत समिती आणि पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागातर्फे आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दौंड तालुक्यातील अनेक अंगणवाड्यांमध्ये अपुरा सकस आहार, खंडित वीजपुरवठा, बिघडलेले वजन काटे, मिनी अंगणवाड्यांच्या समस्या अंगणवाडी सेविकांनी खासदार सुळे यांच्या समोर मांडल्या. यावेळी वीजपुरवठा सुरळीत करून मिनी अंगणवाड्या मोठ्या करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. अंगणवाड्यांमधील बिघडलेले वजनकाटे तपासणीचे आदेश देण्यात आले.

अंगणवाडी सेविकांना टॅब
या पुरस्कार वितरण समारंभावेळी येत्या पंधरा दिवसात अंगणवाडी सेविकांना टॅब वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके यांनी सांगितले. या पुरस्कार वितरण समारंभास जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, वैशाली नागवडे, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके, अप्पासाहेब पवार, मधुकर दोरगे, पंचायत समितीचे सभापती झुंबर गायकवाड, सयाजी ताकवणे, रामभाऊ टुले, रामचंद्र चौधरी, बाजार समितीचे सभापती सागर फडके, गटविकासअधिकारी गणेश मोरे, पूनम दळवी, लक्ष्मण सातपुते, नितीन दोरगे, अजित शितोळे, योगिनी दिवेकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती.