पालघर| राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचा संप गेल्या 11 सप्टेंबरपासून सुरू असून, त्यावर अजून कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्याने हा संप अधिकच चिघळला आहे. याचा परिणाम अंगणवाडीत शिकणार्या आणि आहार घेणार्या बालकांवर झाला आहे. असा आरोप अंगणवाडी महासंघाचे अध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी केला आहे, तर राज्यात 100 बालमृत्यू याच संप काळात झाल्याचेही सांगितले आहे. याच संप काळात विविध कारणांनी पालघर जिल्ह्यातही 15 बालमृत्यू झाल्याची आकडेवारी स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे, तर सन 2016 मधे 254 आणि 2017 मधे जानेवारी ते ऑगस्टपर्यंत 204चा आकडा बालमृत्यूने गाठला आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील खोच येथील विश्वास सवरा या बालकाचा कुपोषण, भूकबळीने 15 सप्टेंबर रोजी मृत्यू झाल्याने कुपोषणानाचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यामुळे कुपोषण निर्मूलनाचा दावा करणारे प्रशासन लोकप्रतिनिधीच्या उपाययोजना वांझोट्या ठरल्यात की काय, असा सवाल निर्माण झाला आहे.
मुंबईपासून अवघ्या 100 किमी अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्याची कुपोषण आजतायत पाठ सोडायला तयार नाही. दरवर्षी सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात येथील कुपोषण डोकं वर काढते. मागील वर्षी याच ग्रामपंचायतमधील सागर वाघ व ईश्वर सवरा या बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाल्याने येथील कुपोषण चांगलेच गाजले होते. यानंतर बालविकास मंत्री पंकजाताई मुंढे, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री दीपक सावंत, पालकमंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वनगा व असे डझनभर मंत्र्यांनी या भागाचे दौरे करून आश्वासनांचा पाऊस पाडला होता. परंतु, एकही आश्वासन या मंत्री महोदयांना पूर्ण करता आले नाही. मात्र, या जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत दर महिन्याला गुपित दौरे करत असून, या भागाचा अभ्यास करण्यातच वेळ दवडतात की काय, असा सवाल नागरिक करताहेत. पावसाळ्यातील शेतीच्या लावणीची कामे आटोपल्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आदिवासीबांधवांच्या हाताला काम नसल्याने त्यातूनच कुपोषणात वाढ होऊन बालमृत्यूची समस्या उद्भवते कुपोषणाचा थेट संबंध रोजगाराशी निगडित आहेत.
रोजगाराच्या यंत्रणा उपलब्ध करून देण्यात अपयशी आहेत. पालघर जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या अंतर्गत एकूण 3181 अंगणवाड्या व मिनी अंगणवाडया असून 4276 बालके कुपोषणाच्या विळख्यात आहेत 655 बालके एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या आकडेवारीनुसार मृत्यूच्या उंबरठ्यावर असल्याने पुन्हा विश्वास सवरा सारखी कुपोषण बळीची भीती व्यक्त केली जात असून हे भयाण वास्तव राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या पालघर जिल्ह्यातील आहे.
राज्यात जे काही बालकांचे मृत्यू झालेत ते इतर कारणानी झाले असून ते कुपोषण किवा भुकेमुळे झालेले नाहीत. पालघरमध्येसुद्धा जे 15 बालमृत्यू झाले ते कुपोषणामुळे नाहीत तर सर्पदंश किंवा इतर कारणांनी झाले आहेत. संप सुरू असला तरी आम्ही बालकांचा आहार बंद केला नसून तो सुरूच आहे. त्यामुळे जे काही बाहेर बोलले जाते ते चुकीचे आहे.
– डॉ. दीपक सावंत, आरोग्य मंत्री.