अंगणवाडी सेविकांना पाठिंबा, मात्र मनपा शाळातील शिक्षक वाऱ्यावर!

0

10 वर्ष झाले शिक्षकांचे मानधन वाढलेच नाही

मुंबई:- राज्यभरात सुरू असलेल्या अंगणवाडी संपाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र मनपाच्या मुंबई पब्लिक स्कुलमधील शिक्षिकांच्या वेतनात गेल्या 10 वर्षात वाढ न झाल्याने 70 टक्के शिक्षिकांनी नोकरी सोडली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या शिक्षिकांच्या वेतनवाढीवर उद्धव ठाकरे कधी बोलणार? किंवा वेतनवाढीसाठी काय उपाययोजना करणार? असा सवाल शिक्षक परिषदेकडून विचारला जात आहे. मनपामध्ये 2007-08 पासून 60 शाळा मुंबई पब्लिक स्कुल सुरू केल्या आहेत. या सर्व शाळांमध्ये 100 महिला शिक्षिकांची मानधन तत्वावर नेमणूक केली होती. मात्र 10 वर्षांनंतरही त्यांचे मानधन वाढवले नसल्याने 68 शिक्षिकांनी काम सोडले असल्याची माहिती आहे.

10 वर्षांपासून 5000 मानधनावर काम
मनपाच्या मुंबई पब्लिक स्कुलमध्ये नियुक्त या 100 शिक्षिकांना 5000 हजार रुपये मानधन दिले जात आहे. मानधन न मिळाल्याने 68 शिक्षिकांनी काम सोडले असून आता केवळ 32 शिक्षिका कामावर असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवराज दराडे यांनी सांगितले. मुंबईसारख्या शहरात केवळ 5 हजार रुपयात काम करणे कठीण आहे. याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा उरलेल्या शिक्षिकांचे देखील कामावर राहणे कठीण असल्याचे एका शिक्षिकेने सांगितले. मनपाच्या अंतर्गत 504 बालवाड्या 1985 पासून सुरू आहेत. या बालवाड्यातील शिक्षकांना 3000 रुपयेच वेतन तेंव्हापासून दिले जात आहे. वेतन आणि अन्य समस्यांमुळे आता ह्यामधील अनेक बालवाड्या स्वयंसेवी संस्थांना चालवायला दिल्या असल्याचे दराडे यांनी सांगितले.

मनपाने सर्व बालवाड्या आणि स्कुल स्वतः व्यवस्थित चालवाव्या. मनपाकडून आधी त्यांना सन्मानजनक वेतन देणे आवश्यक आहे. एकीकडे मनपातील शिक्षकांचा पगार जैसे थे आहे. एकीकडे उद्धव ठाकरे अंगनवाडी सेविकांना पाठिंबा देत आहेत. आणि दुसरीकडे मनपा शाळांतील सेविकांवर अन्याय होतेय हे त्यांना दिसत नाही. ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे.
– शिवनाथ दराडे
शिक्षक परिषद मुंबई, कार्यवाह