अंगणवाडी सेविका भरती रखडली

0

पुणे : जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागातर्फे चालविल्या जाणार्‍या अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस तसेच बालविकास प्रशिक्षण अधिकारी आणि सहायक अधिकारी मोलाची भूमिका बजावत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून यांची भरती जिल्हा परिषदेतर्फे झाली नसल्याने अनेक पदे रिक्त असल्याने कर्मचार्‍यांवर भार येत आहे.

बाल विकास प्रशिक्षण अधिकारी, सहाय्यक बालविकास प्रशिक्षण अधिकारी यांच्या सोबतच पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी केंद्र चालविले जातात. गेल्या काही दिवसांपासून या पदांची भरती प्रक्रिया बंद आहे. ज्येष्ठनेतनुसार बहूतांश कर्मचारी रिक्त झाल्याने अनेक पदे ही रिक्त झाले आहेत. ही पदे न भरल्याने कर्मचार्‍यांवर ताण येत आहेत.

बाल विकास प्रशिक्षण अधिकार्‍यांची 21 पदे मंजूर आहेत. यातील केवळ 8 पदे भरली गेली असल्याने 13 जागा रिक्त आहेत. पर्यवेक्षिकांचे जवळपास 164 पदे मंजूर आहेत. मात्र, 147 पदे ही भरली गेली आहेत. 17 पदे ही रिक्त आहेत. अंगणवाडी सेविकांची 4 हजार 150 पदे ही मंजूर आहेत. यातील 4 हजार 40 पदे ही भरली गेली असून जवळपास 100 पदे ही रिक्त आहेत. तसेच मदतनिसांची 4 हजार 150 पदे मंजूर असताना केवळ 3 हजार 962 पदे ही भरली गेली आहेत. 188 मदतनिसांची पदे ही रिक्त आहेत. मिनी अंगणवाडी केंद्रासाठी 473 पदे मंजूर असताना 439 पदे भरली गेली असून 34 पदे ही रिक्त आहेत.