अंगणवाड्यांना मिळणार हक्काची जागा

0

इमारत बांधकाम, दुरुस्तीसाठी 8 कोटी 75 लाख अनुदान

पुणे : जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या इमारत बांधकाम आणि दुरुस्तीसाठी अनुदान देण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेकडून 2018-19 मधील 8 कोटी 75 लाख अनुदान पंचायत समिती स्तरावर वाटप करण्यात आले आहे. या अनुदानामधून जिल्ह्यात 104 अंगणवाड्यांना हक्काची इमारत मिळणार असल्याची माहिती महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी दिली.

मुलांना शाळेत येण्याची सवय लागावी आणि शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी गावांमध्ये अंगणवाड्या उभारण्यात आल्या. अंगणवाडीत येणार्‍या मुलांना सेविका आणि मदतनीस घडवत असतात. जिल्ह्यात 4 हजार 623 अंगणवाड्या आहेत. त्यातील 3 हजार 391 अंगणवाड्यांना स्वत:च्या हक्काची जागा असून, त्याठिकाणी बांधण्यात आलेल्या खोलीमध्ये अंगणवाडी भरते. परंतू, एक हजाराहून अधिक अंगणवाड्यांना हक्काची खोली नसल्याने नाईलाजास्तव या मुलांना समाजमंदिर, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय किंवा एखाद्या झाडाखाली बसावे लागत आहे. पावसाळ्यात या मुलांचे हाल होत असल्यामुळे त्यांना हक्काची अंगणवाडी मिळवून देण्यासाठी महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके या सतत प्रयत्नशील आहेत. यापैकी आता जिल्ह्यातील 104 अंगणवाड्यांना प्रत्येकी सात लाखांचे अनुदान इमारत बांधकामासाठी वितरीत करण्यात आले आहे.

561 इमारतींची होणार दुरुस्ती

1,232 अंगणवाड्यांपैकी 104 अंगणवाड्यांना हक्काचे छत मिळणार असून आणखी एक हजार अंगणवाड्यांना इमारतींची आवश्यकता आहे. गतवर्षीची अखर्चित रक्कम 67 लाख 18 हजार 405 रुपये आणि चालूवर्षीची रक्कम मिळून 9 कोटी 42 लाख रुपये नवीन इमारत आणि शौचालय, दुरुस्तीसाठी देण्यात आली आहे. 561 इमारतींची दुरुस्ती होणार असून त्यासाठी प्रत्येकी 1 लाख रुपये, तर 230 शौचालयांच्या बांधकामासाठी प्रत्येक 40 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.