मुंबई । अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात सोमवारी मध्य रात्रीपासून भक्तांनी मोठी गर्दी केली होती. श्रीगणेशाच्या दर्शनासाठी भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांग लावल्या होत्या. ही अंगारकी चतुर्थी वर्षातील शेवटची अंगारकी होती. यानिमित्त मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली होती. मुंबईसह उपनगरातून बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक आले होते. त्यामुळे दादरमधील प्रभादेवी परिसर भाविकांनी फुलून गेला होता. मात्र, मध्यरात्रीपासूनच भाविकांनी मंदिराकडे मोठी गर्दी केली होती. म्हणून काही भाविक मुख दर्शन घेऊन किंवा कळस दर्शन घेऊन समाधान मानत होते. श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रभरातून भक्त मुंबईत येतात. विशेषतः दर मंगळवारी संकष्टी, अंगारकी चतुर्थी, माघी गणपती, गणेशोत्सव या काळात भक्तांची रीघ लागते. अंगारकीला रात्री होणार्या पूजेच्या वेळी उपस्थित राहता यावे, म्हणूनही मोठ्या संख्येने भक्त गण मध्यरात्रीच मंदिरात पोहोचत असतात.
अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गणेश भक्त उपास करत असतात, त्यामुळे अनेक गणेश भक्त यानिमित्ताने आवर्जून श्री गणेशाच्या दर्शनाला जात असतात. श्रीगणेशाचे भावपूर्ण दर्शन घेत असतात. त्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, यंदाही यानिमित्ताने गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्यामुळे आज सिद्धिविनायक मंदिरात नेहमीच्या तुलनेत आज अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिरात कोणताची अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घेतली जात होती तसेच भक्तांना रांगेत सोडले जात होते. कुठेही घाई गडबड होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत होती. आज दिवसभर मंदिरात भक्तांची ओघ कायम होता. मंदिर प्रशासनानेही भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून जय्यत तयारी करण्यात आली होती.