अंगावर पेट्रोल ओतून वृद्धाला जीवंत पेटविले!

0

पिंपरी-चिंचवड : दुचाकीवरून आलेल्या तिघांनी एका वृद्धाला बेदम मारहाण करत, त्यांच्याकडील 20 हजार रुपयांची रोकड लांबविली. रोकड हिसकावल्यानंतर तिघांनी वृद्धाच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास नाशिक फाट्यावर घडली. उद्धव आसाराम उनवणे (वय 65, रा. आळंदी. मूळ रा. नाशिक) असे त्या वृद्धाचे नाव आहे. या घटनेत तेे 40 ते 45 टक्के भाजले असून, त्यांना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, भरदुपारी ही संतापजनक घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.

उनवणे मूळचे नाशिकचे रहिवासी

उद्धव उनवणे हे मूळचे नाशिकचे रहिवासी आहेत. चिंचवड येथील एका खासगी कंपनीत ते नोकरी करतात. सध्या ते आळंदी येथे राहत आहेत. त्यांचे घरभाडे थकले आहे. उनवणे बुधवारी दुपारी नाशिक येथून पैसे घेऊन आले होते. वल्लभनगर बसस्थानकात उतरल्यानंतर ते आळंदीला जाणार होते. म्हणून ते पायी नाशिक फाट्याकडे जात होते. त्यावेळी दुचाकीवरील तिघेजण त्यांचा पाठलाग करत होते. नाशिक फाट्यावर आल्यानंतर उनवणे रस्त्याच्या कडेला बसले होते. त्यावेळी आलेल्या तिघांनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्याकडील 20 हजार रुपयांची रोकड काढून घेतली आणि डोक्यावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून देऊन पोबारा केला. यामध्ये उनवणे 40 ते 45 टक्के भाजले आहेत.

वायसीएम रुग्णालयात प्रथमोपचार

सामाजिक कार्यकर्ते पोपट शहा आणि संतोष कासार यांनी उनवणे यांना त्वरित उपचारासाठी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नेले. वायसीएममध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. उनवणे गंभीर भाजले असून, त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.