पुणे । विकासाच्या नावाखाली जगातील प्रमुख देशांकडून पृथ्वीचे व्याकरण बिघडवण्याचे काम सुरू आहे. यामुळे पृथ्वीवरील शांतता धोक्यात येत असून पर्यावरणाचे नुकसान होत आहे. येत्या काळात जगात पाण्यावरून तिसरे युद्ध होणार असल्याचे बोलले जाते. अशा परिस्थितीत पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असताना ‘अंघोळीची गोळी’ हा सर्वसामान्य माणसाने राबविलेल्या एक स्तुत्य उपक्रम आहे, असे मत माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सोमवारी व्यक्त केले.
‘अंघोळीची गोळी’ या संस्थेतर्फे मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ट्रम्प यांना अंघोळीची गोळी दीक्षा आणि दिवाळी अंक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संत साहित्याचे अभ्यासक सचिन पवार, अरविंद जगताप, अंघोळीची गोळी उपक्रम सुरू करणारे माधव पाटील आदी उपस्थित होते.
पाणी वाचवण्यासाठी…
सबनीस म्हणाले, चीन, अमेरिका यांसारख्या जगातील प्रमुख देशांकडून विकासाच्या नावाखाली पृथ्वीचे व्याकरण बिघडवण्याचे काम केले जात आहे.विस्तारवादाच्या माध्यमातून चीन प्रशांत महासागरामध्ये पाय रोवत आहे, तर तेलसाठ्यावर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेने इराकला उद्ध्वस्त केले. यामुळे पृथ्वीवरील शांतता धोक्यात येत असून पर्यावरणाचे नुकसान होत आहे. येत्या काळात जगात पाण्यावरून तिसरे युद्ध होणार असल्याचे बोलले जाते. अशा परिस्थितीत पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असतानाअंघोळीची गोळी या सामान्य माणसाने सुरू केलेल्या उपक्रमाचे कौतुक करावे लागेल. महिन्यातून किमान एकदा अंघोळ न करता पाणी वाचवावे असे संदेश देणारी अंघोळीची गोळी हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाटील यांनी केले.