जळगाव । बेटावद ते मुसळी फाटा हा रस्ता केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्ग घोषित केला असून या रस्त्यावर धरणगाव शहरात वाहतूकीची कोंडी होवू नये. यासाठी या रस्त्याला धरणगाव शहराजवळ बाह्यवळण रस्ता तयार करण्यात येईल, अशी माहिती सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. सोनवद ता. धरणगाव येथील अंजनी नदीवर 1 कोटी 33 लाख रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या मोठ्या पुलाच्या बांधकामाचे भुमिपूजन ना. पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता मोराणकर, उपअभियंता ए. जे. पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, धरणगाव पंचायत समितीचे उपसभापती हेमराज पाटील, तहसीलदार श्री. राजपूत, गटविकास अधिकारी जाधव, तालुका प्रमुख गजानन पाटील, नानाभाऊ सोनवणे, संजय पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ होते. यावेळी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, गोपाल चौधरी, प्रतापराव पाटील, गजानन पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास सोनवद परिसरातील विविध गावांचे सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.