अंजनी प्रकल्पातील जलसाठा घटल्याने पाणी टंचाईची शक्यता

0

एरंडोल । तालुक्यातील अंजनी प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत असल्यामुळे पावसाळा लांबल्यास तालुक्यात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. अंजनी प्रकल्पातून एरंडोल शहरासह कासोदा, हनमंतखेडे, नांदखुर्द, धारागीर या गावांसह ग्रामीण भागातील अनेक गावांना पाणी पुरवठा केला जातो. तसेच ग्रामीण भागात पाण्याची समस्या निर्माण झाल्यास प्रकल्पातील जलसाठ्यातूनच पाणी भरण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

जुलै महिन्यातच पाण्याची समस्या निर्माण होण्याची भिती
जलसाठ्यात होत असलेली घट पाहता जुलैच्या दुसर्‍या आठवड्यातच पाण्याची समस्या निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीत शहरात दोन ते तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असून अनेक खासगी व सार्वजनिक नळांना तोट्या नसल्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. ज्या प्रभागामध्ये पाणी सोडले जाईल त्या प्रभागात पालिकेच्या कर्मचार्‍यांनी गस्त घालून पाणी वाया जाणार नाही तसेच पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

कृषीपंप जप्त करत केली कारवाई
पावसाळा सुरु होण्यास अजून बराच कालावधी असल्यामुळे प्रकल्पातील जलसाठ्याचे नियोजन करण्याची गरज आहे. प्रकल्पातील पाण्याचा कृषी साठी वापर होऊ नये म्हणून नगर पालिका व पाटबंधारे खात्याने संयुक्तपणे मोहीम सुरु करून यापूर्वीच आठ कृषिपंप जप्त करून कारवाई केली आहे.जिल्हा प्रशासनाने देखील प्रकल्पातील जलसाठा पिण्यासाठी आरक्षित असून कृषीसाठी त्याचा वापर होऊ नये असे आदेश पाटबंधारे खात्यास यापुर्वीच दिले आहेत. समन्वय समितीच्या सभेत अंजनी प्रकल्पातील जलसाठा 31 जुलैपर्यंत पुरेल असे सांगण्यात आले होते.

पाणी बचतीचे आवाहन
दरम्यान अंजनी प्रकल्पाचे वाढीव उंचीसह काम पूर्ण झाले आहे. मात्र वाढीव उंचीत बुडीत होणार्‍या तीन गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप पर्यंत सुटला नसल्यामुळे प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा करण्यास अनेक अडचणी येत असतात. तिन्ही गावांच्या पुनर्वसनाची समस्या सोडविण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. प्रकल्पातील जलसाठ्यात होणारी घट लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन नगरपालिका प्रशासनाने केले आहे.