एरंडोल । तालुक्यातील पळासदळ येथील अंजनी प्रकल्पात अत्यंत कमी जलसाठा असल्यामुळे भविष्यात पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी प्रकल्पातील जलसाठ्याचे नियोजन करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत प्रकल्पात केवळ अठरा टक्के जलसाठा असून नागरीकांनी देखील पाण्याचा अपव्यय होणार नाही, पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दुसरीकडे ऐतिहासिक महत्व असणार्या अंजनी नदीच्या पात्राची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. नदीच्या पात्राला गटार गंगेचे स्वरूप प्राप्त झाले असून नगरपालिकेने पत्राच्या स्वच्छतेची घोषणा करून देखील संबंधीत विभागाने पात्राच्या स्वच्घ्छतेकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या या अडमुठे कारभारामुळे परीसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
अत्यल्प जलसाठ्यामुळे भविष्यात होणार पाणीटंचाई
अंजनी प्रकल्पातून एरंडोल शहरासह कासोदा, धारागीर, जळू, नांद खुर्द, हनमंतखेडा या प्रमुख गावांना पाणीपुरवठा करण्यात येत असून आगामी काळात तालुक्यात पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास टंकरणे पाणीपुरवठा करण्यासाठी देखील प्रकल्पातूनच पाणी भरावे लागणार आहे. मागीलवर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे प्रकल्पात पुरेशा प्रमाणावार जलसाठा होऊ शकला नाही. त्यामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाण्याची समस्या लक्षात घेता प्रकल्पातील जलसाठ्याचे योग्य ते नियोजन करण्याची गरज आहे. प्रकल्पातून कृषीसाठी पंपाद्वारे होणारा पाणीपुरवठा त्वरित बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. प्रकल्पातील जलसाठ्यात वाढत्या तापमानामुळे लक्षणीय घट होत आहे. सद्यस्थितीत शहरात 3 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहरात अनेक खाजगी व सार्वजनिक नळांना तोट्या नसल्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असून पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. दरम्यान अंजनी प्रकल्पातून पाण्याची चोरी करणार्यां विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. अंजनी प्रकल्पातील जलसाठ्यात असलेले सडलेल्या अवस्थेतील झाडे त्वरित तोडण्यात यावेत अशी मागणी नागरीकांनी केली आहे. दरम्यान अंजनी प्रकल्पाचे वाढीव उंचीसह काम पूर्ण झाले आहे मात्र वाढीव उंचीत बुडीत होणार्या तिन गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटू न शकल्यामुळे प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा करण्यास अनेक अडचणी येत आहेत. तीनही गावांच्या पुनर्वसनाची समस्या सोडविल्यास एरंडोल व धरणगाव तालुक्यातील हजारो एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून पाण्याची समस्या कायम स्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे. याबाबत पालकमंत्री व पाटबंधारे मंत्र्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकर्यांनी र्यांनी केली आहे.
अंजनी नदीच्या पात्राची दयनीय अवस्था, स्वच्छतेकडे पालिकेचे दुर्लक्ष
सद्यस्थितीत अंजनी नदीच्या पात्रात सर्वत्र विविध प्रकारच्या वनस्पती वाढल्या असून शहरातील सर्व सांडपाणी पात्रात जमा होते.वीटभट्टी चालकांनी पात्रात अतिक्रमण केले आहे.पात्रात सर्वत्र सांडपाणी जमा होत असल्यामुळे याठिकाणी मोकाट जनावरे,डुकरे व भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार दिसून येतो.नदी पात्रातील वाळूची उचल यापूर्वीच वाळू माफियांनी केलेली असल्यामुळे पात्रात सर्वत्र खड्डे तयार झाले असुन मोठमोठे खडक दिसत असल्यामुळे पात्राचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट झाले आहे.या पूर्वी पात्राचा वापर नागरीकांकडून प्रात:विधी साठी केला जात होता.पालिकेने शहर हागणदारी मुक्त करण्याच्या दृष्टीने पत्रात प्रात:विधी करणार्या नागरिकांविरोधात कडक भूमिका घेतल्यामुळे पात्रातील घाण काही प्रमाणात कमी झाली आहे.यापूर्वी शहरातील काही सामाजिक क्षेत्रात काम करणार्या पदाधिकार्यांनी एकत्र येऊन लोक वर्गणी जमा करून श्रमदानाने पात्राची स्वच्छता करून आदर्श निर्माण केला होता.मात्र त्यानंतर पालिकेसह पाटबंधारे खात्याने पात्राच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे पात्राची स्थिती जैसे थे झाली आहे.सुमारे पस्तीस वर्षापूर्वी अंजनी नदीच्या पात्रातून वर्षभर पाणी वाहत असे.
दुर्गंधीमुळे आरोग्यास धोका
युवकांसह जेष्ठ नागरिक देखील नदीच्या पात्रातून वाहणार्या पाण्यामध्ये पोहण्याचा मनमुराद आनंद लुटत होते. तसेच पाण्यात पोहत असलेल्या बदकांचे थवे पाहण्यासाठी लहान मुले नदीवर जात होते. नदीच्या पात्रात वाळूचे साठे असल्यामुळे नदी किनारी भोई समाजाचे नागरिक डांगर व टरबूजाची लावणी करीत होते. मात्र सद्यस्थितीत पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तसेच नदीवर अंजनी प्रकल्प बांधण्यात आल्यामुळे नदीचे पात्र केवळ पावसाळ्यात काही दिवस वाहत असते. पात्रामध्ये सांडपाणीसह कचरा जमा झालेला असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याबाबत नगर पालिकेने यापूर्वी घोषणा केल्या प्रमाणे पात्राची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.