नगर । क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या पत्नी अंजली तेंडुलकर यांनी नुकतीच अहमदनगर तालुक्यातील करंजी गावाला धावती भेट देत शेतकर्यांशी संवाद साधला. कोणतीही पूर्वकल्पना न देता आलेल्या या अनाहूत पाहुण्यामुळे करंजी ग्रामस्थ मात्र चांगलेच भारावून गेले होते. करंजी येथील भट्टेवाडी येथे दाखल झाली. या गाडीत नेमके कोण आहे म्हणून काही ग्रामस्थ गाडीच्या जवळ गेले असता त्या गाडीतून अंजली तेंडुलकर व त्यांच्या मावसबहीण कलीआ चाँदमाल या गाडीतून उतरल्या. चाँदमल या शेतीतज्ज्ञ असून ग्रामीण भागातील शेतकर्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी मार्गदर्शन करतात.
सेंद्रीय शेतीची केली पाहणी
चाँदमल यांच्या विनंतीवरून ग्रामीण भागातील शेतीची पहाणी करण्यासाठी तेंडुलकर भटेवाडी येथे आल्या होत्या. त्या आल्याचे कळताच या परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली. करंजीचे रहिवासी व सेनेचे तालुकाध्यक्ष शेख यांनी तेंडुलकर यांचे यावेळी संत्रा मोसंबी आणि डाळिंबाची फळे देऊन स्वागत केले. करंजी येथील भटेवाडी येथे सोशल सेंटर या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून शेतकर्यांना नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शन केले जाते. त्यानिमित्ताने गोवा येथून तेंडुलकर यांची मावसबहीण कमीआ चाँदमाल व अॅलीक्स मायकल करंजी येथील शेतकर्यांना नैसर्गिक शेती करण्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी गेली आठ दिवसांपासून ठाण मांडून आहेत.