माजी मंत्री एकनाथराव खडसे ; अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार
भुसावळ:– माझ्यावर आरोप केल्याने सहज प्रसिद्धी मिळते हे अंजली दमानिया यांना ठावूक असल्याने त्यांची नाहक बडबड सुरू आहे. त्यापेक्षा त्यांनी न्यायालयात आपले म्हणणे मांडून पुरावे द्यावे कारण आता चांगली संधीदेखील त्यांना आहे. अंजली दमानियांचे वक्तव्य म्हणजे एक प्रकारे सुपारी घेतल्याचे उद्योग असल्याचे मत माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दैनिक जनशक्तीशी बोलताना व्यक्त केले.
रावेर येथे न्यायालयीन कामकाजानिमित्त आलेल्या दमानिया यांनी खडसेंवर शरसंधान साधत भुजबळ, कल्पना ईनामदार व खडसेंमधील लिंक तीन दिवसात ओपण करणार असल्याचे सुतोवाच केले होते. खडसे यांनी आपल्याविरुद्ध एकही खटला दाखल केला नाही कारण तसे केले असते तर ते जेरीस आले असते, असेही दमानिया म्हटल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्यवर माजी मंत्री खडसे यांनी सांगितले की, दमानिया यांच्या विनंतीला मान देऊन आपण त्यांच्यावर आता व्यक्तीगत अब्रु नुकसानीचा दावा करणार आहोत. त्यांनी आता न्यायालयात सादर करण्यासाठी पुरावे गोळा करून ठेवावेत, त्यांना आता चांगली संधी असल्याचेही ते म्हणाले.