माजी मंत्री खडसेंना अडकावण्याचे प्रकरण : खडसेंच्या आगामी भूमिकेकडे लागले लक्ष
भुसावळ (गणेश वाघ)- माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना लाचेच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली अनिष दमानिया व त्यांचे पती अनिष दिनेश दमानिया (दोन्ही रा.बी.504, विजय श्रीदुर्ग, सांताक्रुझ जिमखान्यासमोर, सहावा रोड, सांताक्रुझ ईस्ट, मुंबई) व त्यांच्यासह अन्य सहा ते सात अनोळखी आरोपींविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात 19 एप्रिल 2018 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल झालेला हा गुन्हा रद्द करण्यासंदर्भात अंजली दमानिया यांनी खंडपीठात दाद मागितली होती तर खडसेंनी दाखल केलेली फिर्याद क्वॅश (रद्द) करण्याचे आदेश न्या.तानाजी नलावडे यांनी दिल्याने दमानियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ईनामदारांच्या आरोपानंतर दाखल झाला होता गुन्हा
सामाजिक कार्यकर्त्या कल्पना ईनामदार यांना दमानिया यांनी काही महिन्यांपूर्वी खडसेंना अडकावण्यासाठी आमिष दिल्याचा गौप्यस्फोट स्वतः ईनामदार यांनी खाजगी वृत्तवाहिनीवर केला होता. माजी मंत्री खडसे यांना अडकावण्यासाठी काही रक्कम व कागदपत्रे देते व त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांना मागावून मी आणते, असे दमानिया यांनी आपल्याला सांगितल्याची कबुली ईनामदार यांनी दिली होती. हा संदर्भ घेऊन खडसे यांनी फिर्याद दिली होती. लोकसेवकाला फसवण्याचा कट रचणे तसेच सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दमानिया यांच्यासह त्यांचे पती व अन्य सहा ते सात जणांविरुद्ध भाग पाच, गुरनं.69/18, भादंवि 451, 452, 116, 120 (ब), 186 प्रमाणे मुक्ताईनगर पोलिसात 19 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दमानियांची शेतजमीन शासन जमा केल्याचा रोष -खडसेंची फिर्याद
खडसेंंनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दोन पानी लेखी फिर्याद दिली होती. त्यात म्हटले होते की, मी मंत्रीपदी असताना 2012 मध्ये दमानिया यांनी शेतकरी नसताना बनावट पुरावे सादर करून जमीन खरेदी केली होती व आपण शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर ही जमीन शासन जमा झाली. तेव्हापासून दमानियांचा आपल्यावर रोष असून त्यांचे बेछूट आरोप सुरू आहेत. एकही कागदोपत्री पुरावा त्यांनी आतापर्यंत सादर केलेला नाही. 11 एप्रिल 2018 रोजी कल्पना ईनामदार यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परीषदेत अंजली दमानिया, त्यांचे पती अनिल व अन्य काहींनी दमानियांच्या राहत्या घरी बैठक घेऊन खडसेंना अडकवण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे व पैसे देतो ते खडसेंच्या मुक्ताईनगर वा मुंबईतील कार्यालयात ठेवा व यानंतर आम्ही लागलीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांना घेऊन येते, असे दमानिया यांनी सांगत खडसेंना अडकावणे हा आपला प्रण असल्याचे आपल्याला सांगितल्याचे ईनामदार यांनी जाहीर केले होते तर ईनामदार यांनी या कटात सहभागी होण्यास नकार दिला होता. लोकसेवकाला कर्तव्य बजावण्यापासून रोखणे, त्याच्याविरुद्ध कट रचल्याने फिर्याद दिल्याचे खडसे यांनी म्हटले होते.
खंडपीठात दमानियांना मिळाला दिलासा
खडसेंनी दाखल केलेली फिर्याद रद्द होण्यासंदर्भात दमानियांनी खंडपीठात दाद मागितली होती. खंडपीठात मंगळवारी न्या.तानाजी नलावडे यांच्या न्यायासनासमोर याचिकेबाबत सुनावणी झाली. दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद झाल्यानंतर खडसेंनी दाखल केलेली फिर्याद क्वॅश (रद्द) करण्याचे आदेश न्या.नलावडे यांनी दिली. दमानियांतर्फे अॅड.सतेज जाधव तर खडसेंतर्फे अॅड.विनायक दीक्षित व सरकार पक्षातर्फे मुख्य सरकारी वकील अमरदीप गिरासे यांनी युक्तीवाद केला.
माझ्याविरुद्ध बोगस एफआयआर -दमानिया
खंडपीठात एफआयआर रद्दसाठी आपण याचिका दाखल केली होती ती रद्द झाली असून खडसेंनी आपल्याविरुद्ध बोगस एफआयआर दाखल केल्याचे सिद्ध झाल्याचे दमानिया ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना म्हणाल्या.
दमानियांना बोगस आरोपांची सवय -नाथाभाऊ
या प्रकरणात चौकशी अधिक चौकशी करण्याची गरज होती शिवाय कल्पना ईनामदार यांनी नार्को टेस्ट करण्याची मागणीही केली होती. तांत्रिक कारणासाठी एफआयआर क्वॅश झाली. दमानियांना बोगस आरोप करण्याची सवय असल्याने त्यांच्या आरोपांकडे मी लक्ष देत नाही, असे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.