अंजली दमानियांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात अखेर गुन्हा दाखल

0
माजी मंत्री खडसेंना अडकावण्याचा प्रयत्न भोवला ; तपासासाठी दिली पोलिसांना सीडी
भुसावळ:- लोकसेवक तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना लाचेच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या  अंजली अनिष दमानिया व त्यांचे पती अनिष दिनेश दमानिया (दोन्ही रा.बी.504, शांताक्रुझ जिमखान्यासमोर, हवा रोड, शांताक्रुझ ईस्ट, मुंबई) व त्यांच्यासह अन्य सहा ते सात अनोळखी आरोपींविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुरूवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यात स्वतः माजी मंत्री खडसे फिर्यादी झाले असून त्यांनी सायंकाळी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात येत तक्रार दाखल केली.
सातत्याने आरोप करणे दमानियांना भोवले
सामाजिक कार्यकर्त्या कल्पना ईनामदार यांना दमानिया यांनी काही महिन्यांपूर्वी खडसेंना अडकावण्यासाठी आमिष दिल्याचा गौप्यस्फोट स्वतः ईनामदार यांनी खाजगी वृत्तवाहिनीवर केला होता. माजी मंत्री खडसे यांना अडकावण्यासाठी काही रक्कम व कागदपत्रे देते व त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांना मागावून मी आणते, असे दमानिया यांनी आपल्याला सांगितल्याची कबुली ईनामदार यांनी दिल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. हा संदर्भ घेऊन खडसे यांनी फिर्याद दिली असून लोकसेवकाला फसवण्याचा कट रचणे तसेच सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दमानिया यांच्यासह त्यांचे पती व अन्य सहा ते सात जणांविरुद्ध भाग पाच, गुरनं.69/18, भादंवि 451, 452, 116, 120 (ब), 186 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
खडसे यांनी दिली तपासासाठी सीडी
खडसेंसह त्यांच्या कुटुंबियांवर गेल्या दोन वर्षांपासून दमानियांचे आरोप सुरू आहेत तर कल्पना ईनामदार यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर त्या मुलाखतीची सीडी खडसे यांनी मुक्ताईनगरचे निरीक्षक अशोक कडलग यांना दिली असून या सीडीद्वारे सत्य शोधून समोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली. याप्रसंगी मुक्ताईनगर पोलीस ठाण्याबाहे खडसे यांचे समर्थक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.