माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या पत्रकार परीषदेनंतर पोलीस अधीक्षकांनी बदलली भूमिका
भुसावळ- माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना अडकवण्यासाठी कट रचणे, फसवणूक करणे तसेच धनादेशाची चोरी करून उच्च न्यायालयात खोटे प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, गजानन मालपूरेंसह सहा जणांविरुद्ध मुक्ताईनगर न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अशोक कडलग करीत असताना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी 23 जून रोजी हा तपास दुय्यम अधिकारी सहाय्यक निरीक्षक हेमंत कडूकार यांच्याकडे सोपवला होता तर यानंतर माजी मंत्री खडसे यांनी जळगाव येथे पत्रकार परीषद घेवून जिल्हा पोलीस अधीक्षकांसह पोलीस प्रशासनावर टिकेची तोफ डागली होती. संशयीत आरोपीच्या सांगण्यावरून तपासाधिकारी बदलण्यात आल्याचे खडसे यांनी सांगत मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाची तक्रार करत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. या सर्व घडामोडीनंतर गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पुन्हा निरीक्षक कडलग यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपवला आहे.
एका आरोपीला पोलीस कोठडी तर तिघांना न्यायालयीन कोठडी
या गुन्ह्याचा तपास करताना निरीक्षक कडलग यांनी 21 रोजी चोपडा अर्बन बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकासह चौघांना अटक केली होती. संशयीतांची कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता अविनाश पाटील (चोपडा) यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर अन्य संशयीत तथा वसुली अधिकारी किशोर लक्ष्मण अत्तरदे, योगेश काशीनाथ बर्हाटे (चोपडा) व शरद वानखेडे (खेडी) यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. खडसे यांच्यातर्फे अॅड.प्रकाश पाटील व अॅड.उमेश जवरे यांनी काम पाहिले.