अंजली दमानिया या तर प्याद्या ; मला अडकवण्यासाठी एका मंत्र्यांचा हात

0

एकनाथराव खडसेंचा दावा ; अपसंपदा प्रकरणात फसववण्यासाठी बनावट धनादेश बनवले

भुसावळ- माझ्यासह परीवाराची बदनामी होण्यासाठी अपसंपदेचा आरोप तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. माझ्या खात्यात धनादेशाद्वारे रक्कम जमा करण्यात आली हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी चक्क बनावट धनादेश सादर करून न्यायालयाची फसवणूक करण्यात आली, असे सांगत आपण मंत्री मंडळातून बाहेर रहावे यासाठी एका मंत्र्याचा हात असल्याचा खळबळजनक दावा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भुसावळातील पत्रकार परीषदेत केला. बुधवारी भाजपा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकार परीषद घेतली.

दवाबामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दाखल केला नाही गुन्हा !
खडसेंनी अपसंपदा जमवल्याचा आरोप करीत दमानियांनी त्यांच्याविरुद्ध क्रिमीनल पब्लिक इंटरेस्ट लिटीगेशन दाखल केले होते. त्या दाव्यात सादर करण्यात पुराव्यांमध्ये खडसेंच्या खात्यात चोपडा अर्बन को ऑपरेटीव्ह बँक लि.चोपडाद्वारे साडेनऊ कोटी रुपये रकमेचा धनादेश जळगाव अ‍ॅक्सीस बँक शाखेच्या नावाने अदा करण्यात आल्याचे भासवून उच्च न्यायालयाची फसवणूक करण्यात आली तसेच दहा लाखांच्या डिमांड ड्राप्ट खडसेंच्या खात्यात जमा झाल्याचे दर्शवून न्यायालयाची फसवणूक करण्यात आल्याचे खडसे म्हणाले. या प्रकाराची चौकशीची मागणी आपण केल्यानंतर तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर व तत्कालीन निरीक्षक राजेशहसिंह चंदेल यांनी या प्रकरणाची चौकशी करून तसा लेखी अहवालदेखील दिला होता. या अहवालाच्या आधारे आपण उभयंतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक, मुक्ताईनगर पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षकांकडे तब्बल महिना-दिड महिन्यांपासून करीत होतो मात्र त्यांनी कुणाच्यातरी दबावामुळे गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोपही खडसे यांनी केला. माझ्या सारख्या माजी मंत्र्याची ही अवस्था असल्यावर इतरांचे काय होत असेल? असा प्रश्‍नदेखील त्यांनी उपस्थित केला.

त्रास देणार्‍यांना नागडे करणार -संतप्त खडसेंचा इशारा
मी मंत्री मंडळातून बाहेर पडावे यासाठी नियोजनबद्ध षडयंत्र रचण्यात आले त्यामुळे दमानिया या केवळ प्याद्या असून त्यांच्यामागे एका मंत्र्यांचा हात आहे, असे कल्पना ईनामदार यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाल्याचा संदर्भ खडसे म्हणाले की, मला त्रास देणार्‍यांना आता आपण नागडे केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही मग तो कुणीही असो वा कितीही मोठा असो मात्र कायद्याच्या वाटचालीतून आपण लढा देऊ, असेही त्यांनी सांगितले. गेल्या 40 वर्षांच्या राजकीय जीवनात आपल्यावर एकही आरोप झाले नाहीत मात्र गेल्या दोन वर्षांच्या काळात बेछूट आरोपांची मालिका आपल्यामागे राहिली, तीन वेळा एसीबीच्या चौकशीला आपल्यासह परीवाराला सामोरे जावे लागले, असेदेखील खडसे म्हणाले.